सीपी स्कॉडमधील सहायक पोलीस निरिक्षकाच्या अंगावर घातला ट्रक; रेती तस्कराने ट्रकसोबत नेले फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 05:54 PM2022-11-30T17:54:27+5:302022-11-30T17:54:42+5:30

विशेष म्हणजे, तो ट्रक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश इंगळे यांना रेती तस्कराने ट्रकसोबत काही अंतर फरफटत देखील नेले.

The truck driver, who was transporting illegal sand, tried to ram the truck directly into the assistant police inspector | सीपी स्कॉडमधील सहायक पोलीस निरिक्षकाच्या अंगावर घातला ट्रक; रेती तस्कराने ट्रकसोबत नेले फरफटत

सीपी स्कॉडमधील सहायक पोलीस निरिक्षकाच्या अंगावर घातला ट्रक; रेती तस्कराने ट्रकसोबत नेले फरफटत

Next

अमरावती : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने त्याचा ट्रक थेट सहायक पोलीस निरिक्षकांच्या अंगावर नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना अर्जुननगर ते पीडीएमसीदरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व अहफाज अहमद (रा. आझादनगर) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलिसांनी शोएब अहमद व ट्रक चालक रेहान शेख यांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे, तो ट्रक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश इंगळे यांना रेती तस्कराने ट्रकसोबत काही अंतर फरफटत देखील नेले. पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे व पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, त्यांनी गुप्त माहितीवरून एमएच ४८ एजी २४१६ या क्रमांकाच्या ट्रकला अर्जुननगरजवळ थांबण्याचा इशारा दिला. परंतू चालकाने ट्रक थांबविला नाही. त्यामुळे एपीआय इंगळे यांनी पाठलाग केला. ट्रकचालकाने ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखून इंगळे बाजुला सरकले. त्यांनी ट्रकची एक हुक पकडत कॅबिनमधील चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालक रेहान शेखने ट्रक दामटल्याने इंगळे हे ट्रकसोबत फरफटत गेले आणि त्यानंतर चालकाने काही अंतरावरील कृषी अनुसंधान केंद्राजवळ ट्रक थांबविला. त्यावेळी तेथे पोहोचलेल्या शोएब अहमदने एपीआय इंगळे यांच्याशी हुज्जत घातली. ट्रक कसा नेता, ते पाहतो, अशी धमकी देत त्याने सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.

पंचनाम्याची कागदपत्रे फेकली

दरम्यान, पोलिसांसमोर तलाठी आर. पी वानखडे व मंडळ अधिकारी यशवंत चतुर हे घटनास्थळी पंचनामा करीत असता, ट्रकमध्ये उपस्थित असणाऱ्या शोएब अहमदने मंडळ अधिकारी व तलाठी यांना धमक्या देऊन भाऊ अहफाज अहमदला कॉल करून बोलावून घेतले. काही वेळातच अहफाज अहमद घटनास्थळी पोहोचला. त्याने पंचनाम्याचे कागदपत्रे हिसकावली. मारण्याच्या उद्देशाने तो महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना मारहाण करून हुज्जतबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला असता, अहफाज अहमद तेथून पसार झाला, शोएब अहेमद व रेहान शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला.

याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द प्राणघातक हल्ला व शासकीय कामकाजात अडथळा असा गुन्हा नोंदविला.- योगेश इंगळे, सहायक पोलीस निरिक्षक, विशेष पथक

Web Title: The truck driver, who was transporting illegal sand, tried to ram the truck directly into the assistant police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.