कांदिवलीतील हत्याकांडाला जादूटोण्याचे वळण; मृतदेहांच्या पायाला हळद-कुंकू, कापलेले लिंबूही सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:31 PM2022-07-02T15:31:46+5:302022-07-02T15:32:48+5:30
पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मृत किरण आणि तिची मुलगी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कापलेले लिंबू, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत.
मुंबई : शहरात गुरुवारी खळबळ उडविणाऱ्या दळवी रुग्णालय इमारतीमधील हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या कांदिवली पोलीस करत आहेत. तपासादरम्यान मृताच्या घरात कापलेले लिंबू आणि मृतदेहांच्या पायाला हळद-कुंकू लावण्यात आल्याचे आढळले आहे. त्यामुळे तंत्रमंत्र किंवा जादू-टोणा प्रकरणातून हा एखादा बळीचा प्रकार आहे का, या अनुषंगाने सध्या पोलीस विचार करत आहेत.
किरण दळवी (४५), मुस्कान दळवी(२६), भूमी दळवी (१७) आणि शिवदयाल सेन (६०) अशी इमारतीत सापडलेल्या मृतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मृत किरण आणि तिची मुलगी यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कापलेले लिंबू, हळद-कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. तसेच गळफास घेतलेल्या भूमी आणि शिवदयाल याच्या पायाला हळद-कुंकू लावलेले आढळले. त्यामुळे हा सगळा प्रकार तंत्रमंत्राशी किंवा जादू-टोण्याशी संबंधित आहे का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. सेन हा मूळचा बंगाली आहे.
कोणत्याही वाईट गोष्टीचा किंवा एखाद्या पिडेचा कायमचा अंत करायचा असल्यास लिंबू कापून त्यात हळदी-कुंकू लावणे, एखादे शुभ कार्य करण्यासाठी किंवा भूत-पिशाच्चचा अंत करण्यासाठी, मृत व्यक्तींचा अतृप्त आत्मा भटकून त्रास देऊ नये, यासाठी हळदीकुंकू लावणे, अशी अंधश्रध्दा काहींच्यात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार सेन यानेच हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. किरण यांचे पती आशिष दळवी हे मुंबईत दाखल झाले असून त्यांना प्रकरणाचा जबर धक्का बसला आहे. सर्वांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी किरण, मुस्कान आणि भूमी यांना घेऊन सेन हा इंदुरला आशिष यांच्याकडे गेला होता. त्यावेळी त्यांच्यात काही वाद झाले का, याबाबतीतही पोलीस चौकशी करणार आहेत.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सुसाईड नोटची पडताळणी
- बुधवारी उशिरा रात्री सेन आणि भूमी यांनी किरण, मुस्कान यांची हत्या करत स्वतः आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाला आणि कांदिवलीसह शहरात एकच खळबळ उडाली. सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोट हिंदी आणि इंग्रजीमध्ये असून त्यात भूमीने वडील आशिष यांना लहान भावाची काळजी घ्या, असे सांगितले आहे. त्यानुसार या सुसाईड नोट पोलीस पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.