मुलगी पळविल्याच्या संशयावरुन पोलीस ठाण्यातूनच दोघांचे अपहरण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:34 IST2022-03-07T17:33:31+5:302022-03-07T17:34:07+5:30
Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ वर्षीय तरुणी ४ मार्चपासून घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल आहे.

मुलगी पळविल्याच्या संशयावरुन पोलीस ठाण्यातूनच दोघांचे अपहरण, गुन्हा दाखल
जळगाव : मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरुन एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या दोघांचे प्रवेशद्वाराजवळून दोन जणांनी दुचाकीवर बसवून नेत अज्ञातस्थळी नेले व दुसऱ्या दिवशी परत घरी सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ वर्षीय तरुणी ४ मार्चपासून घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल आहे. या तरुणीला सागर (काल्पनिक नाव) नावाच्या तरुणाने पळविल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यावरुन या तरुणासह दोघांना ५ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस ठाण्याच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ येताच या दोघांना तरुणीच्या नातेवाईकांनी दुचाकीवर बसवून नेले.
'आमची मुलगी आणून द्या आणि दोघांना घेऊन जा' अशी धमकी तरुणीच्या मावसभावाने दिली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी परत घरी सोडून दिले. रात्री याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.