म्हाडाची बनावट वेबसाइट बनविणारे दोघे जाळ्यात, अर्ज भरून घेत अनेकांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:26 AM2024-08-19T06:26:25+5:302024-08-19T06:26:35+5:30
कल्पेशने बनावट वेबसाइट तयार केली असून, अमोल म्हाडा अधिकारी म्हणून सांगत फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट बनवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने आता बेड्या ठोकल्या आहेत. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही सराईत गुन्हेगार आहे. कल्पेशने बनावट वेबसाइट तयार केली असून, अमोल म्हाडा अधिकारी म्हणून सांगत फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत १० ते १२ तक्रारदार पुढे आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. म्हाडाच्या घराची सोडतीची संधी साधून दोघांनी हा फसवणुकीची योजना आखली. या बनावट वेबसाइटद्वारे अर्ज स्वीकारून अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाकडून सायबर पोलिस ठाण्याच्या पश्चिम विभागात तक्रार करण्यात आली.
पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलिस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहायक पोलिस निरीक्षक अमित उतेकर आणि पोलिस अंमलदार यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या मदतीने पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.