१० वर्षापूर्वीच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:45 AM2023-03-07T11:45:03+5:302023-03-07T11:45:28+5:30
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती पत्नीच्या मृतदेहासोबत घरातच राहिला. पवन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी शोधत होता
रायपूर - छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात पत्नीची हत्या करून मृतदेहाचे पाच तुकडे केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते. बनावट नोटा छापल्याप्रकरणी तरुणाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. शहरातील साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसलापूर येथे सती साहू (२८) हिच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवणे आणि बनावट नोटा छापल्याप्रकरणी पवन सिंह ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पाण्याच्या टाकीतून पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या सतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे सापडले.
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले की, रविवारी गुन्हे विरोधी आणि सायबर युनिटच्या पथकाला उसलापूर भागातील पवन सिंह ठाकूरच्या घरी बनावट नोटा छापण्याची आणि वापरण्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी ठाकूर याच्या घराची झडती घेतली असता तेथून बनावट नोटा छापण्याचे मशीन आणि खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. घराची झडती घेतली असता विचित्र दुर्गंधी येत असल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. पोलिसांच्या पथकाने घराची झडती घेतली असता बाथरूमला लागून असलेल्या खोलीत पांढऱ्या रंगाची पाण्याची रिकामी टाकी ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने टाकीचे झाकण काढले असता त्यात पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह पाच तुकड्यांमध्ये आढळून आला.
मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
पोलिसांनी ठाकूरची चौकशी केली असता, तो मृतदेह पत्नी सतीचा असल्याचे त्याने सांगितले. ६ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी बाजारातून टाकी आणि कटर मशीन आणले. तिची हत्या केल्यानंतर त्याचे हात पाय कापून जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर जळण्याच्या वासाच्या भीतीने त्याने हात, पाय, धड यांचे पाच तुकडे केले आणि पॉलिथीनमध्ये गुंडाळून टाकीत लपवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असं पोलीस अधीक्षक म्हणाले.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, माझा १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून मला दोन मुले आहेत. मी कुटुंबासह उसलापूर येथे भाड्याच्या घरात राहत होता, मला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. बनावट नोटा छापण्याच्या त्याच्या अवैध धंद्यातही पत्नी अडथळा आणत असे. पत्नीच्या हत्येचा कट रचण्यापूर्वी मी आपल्या दोन मुलांना आई-वडिलांकडे तखतपूर परिसरात असलेल्या गावात सोडून आलो होतो. पोलिसांनी ठाकूरला अटक केली आणि त्याच्याकडून बनावट नोट छापण्याचे मशीन, कटर मशीन, इतर वस्तू जप्त केल्या.
दोन महिने पत्नीच्या मृतदेहासोबत राहिला
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती पत्नीच्या मृतदेहासोबत घरातच राहिला. पवन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी शोधत होता, परंतु शेजारी दाट लोकवस्ती आणि घराशेजारी बांधकाम सुरू असल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. पोलिस चौकशीत पवनने सांगितले की, त्याचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि सतीसोबत प्रेमविवाह केला होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पवनला संशय होता. तो सतीप्रती संशयास्पद होता. या संशयावरून दोघांमध्ये काही काळ वादही सुरू होता.