अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 06:15 PM2022-09-21T18:15:07+5:302022-09-21T18:15:48+5:30

बशीर नूरझाई हा असा अफगानी असामी आहे, ज्याने 1979 ते 1989 या काळात अफगाणिस्तानवर कब्जा करणार्‍या सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढा दिला होता. तालिबानला शस्त्रास्त्रे तोच पुरवायचा. पण अमेरिकेने पकडताच बशीरने तालिबानचे सुमारे 400 विमानविरोधी क्षेपणास्त्रांसह 15 ट्रक शस्त्रे अमेरिकेला पकडून दिली होती.

The US released an Afghan drug mafia haji bashir noorzai as dangerous as Pablo Escobar; India in tension | अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये 

अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये 

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी जगातील कोणत्याही देशात ड्रग्ज पकडले गेले की पहिले नाव यायचे ते हाजी बशीर नूरझाईचे. याला मध्य आशियातील पाब्लो एस्कोबार म्हटले जायचे. गेल्या काही काळापासून तो अमेरिकेच्या तुरुंगात होता. अमेरिकेने त्याला एका इंजिनिअरच्या बदल्यात गुपचूप सोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे भारतीय एजन्सी टेन्शनमध्ये आल्या असून तो सुटल्याने भारतातील ड्रग्ज तस्करी वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. 

नूरझाई एक अफगानी ड्रग माफिया आहे. तो तालिबानचा समर्थक होता. परंतू, अमेरिकेने त्याला ताब्यात घेऊन तालिबानविरोधातच त्याचा वापर केला. अमेरिकी अधिकाऱ्यांनी अफगान-पाकिस्तान सीमेवरून त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याला अटक न करण्याच्या अटीवरच अमेरिकेला नेण्यात आले होते. परंतू, नंतर अमेरिकेने आपले रंग दाखवत त्याच्याकडून तालिबानच्या शस्त्रास्त्रांची माहिती काढली, ती शस्त्रे निकामी केली आणि नंतर त्याला अटक करत शिक्षाही केली. 

बशीर नूरझाई हा असा अफगानी असामी आहे, ज्याने 1979 ते 1989 या काळात अफगाणिस्तानवर कब्जा करणार्‍या सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढा दिला. पण मुल्ला उमर भूमिगत झाल्यावर बशीरने कंदाहारची जबाबदारी सोडली होती. यानंतर त्याने तालिबान राजवटीला स्फोटके, शस्त्रे आणि मिलिशियाचे सैनिकही पुरवले होते. अमेरिकेने अफगानिस्तानवर आक्रमण केले तेव्हा जानेवारी 2002 च्या अखेरीस बशीरने तालिबानचे सुमारे 400 विमानविरोधी क्षेपणास्त्रांसह 15 ट्रक शस्त्रे अमेरिकेला पकडून दिली होती. एप्रिल 2005 मध्ये, नूरझाईला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क शहरात अटक केली. त्याच्यावर US$50 दशलक्ष पेक्षा जास्त किमतीच्या हेरॉईनची अमेरिकेत तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

नूरझाई तुरुंगात गेल्यानंतर त्याचा ड्रग्जचा व्यवसाय झुमा खानने ताब्यात घेतला. पण याच कारणावरून खानला 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. 16 जुलै 2019 रोजी बशीर नूरझाईला युएईमध्ये सोडून देण्यात आल्याचे वृत्त तालिबानने पसरविले होते. परंतू तसे काहीच झालेले नव्हते. मात्र, आता दिवस बदलले आहेत. अफगानिस्तानात पुन्हा तालिबानची सत्ता आली आहे. आता त्याच्या सुटकेची मोठी बातमी समोर आली आहे. 

तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हाजी बशीर नूरझाई याला अमेरिकन नागरिकाच्या बदल्यात तुरुंगातून सोडण्यात आले आहे, तसेच तो 19 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तानात पोहोचला आहे. नूरझाई हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा जवळचा मानला जातो.
 

Web Title: The US released an Afghan drug mafia haji bashir noorzai as dangerous as Pablo Escobar; India in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.