अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला; १२ तासांत ४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:47 AM2023-07-17T08:47:26+5:302023-07-17T08:47:59+5:30
१२ तासांत ४ जणांना अटक; सजग नागरिकामुळे गुन्हेगारांना पकडण्यात यश
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका सजग नागरिकाने अपहरणाचा थेट व्हिडीओ चित्रित करून गुन्हेगारांना पकडण्यात मोठा हातभार लावला. ट्वीटरवर व्हिडीओ पोस्ट करताना त्याने पोलिसांना टॅग केले. माहिती मिळताच पोलिसांची धावपळ झाली आणि पथकाने वाहन क्रमांकाच्या आधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटवली. १२ तासांत चौघांना अटक करण्यात आली.
ही घटना १५ जुलैची आहे. विजय डेनिस नावाचा एक व्यक्ती एचएसआर लेआउट भागात आपल्या कारमध्ये बसला होता. रात्री १२:०० च्या सुमारास काही लोक पबमधून बाहेर आले आणि त्यांनी एका व्यक्तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना विजयने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अर्ध्या तासानंतर विजयने ट्वीटरवर कर्नाटक पोलिस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना टॅग करत व्हिडीओ पोस्ट केला.
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस पथकाने जनार्दन, मधुसूदन, योगेश्वर आणि आनंद बाबू या आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी सांगितले की, अपहरण झालेला आणि आरोपी हे मित्र असून, त्यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता.