पोलिसांना टीप दिल्याचा संशय, चिकन दुकानदारावर गावगुंडांचा गोळीबार
By पंकज पाटील | Published: August 28, 2022 05:14 PM2022-08-28T17:14:05+5:302022-08-28T17:14:50+5:30
बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान असून तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने आपल्या सहकाऱ्यांसह येत होता.
पंकज पाटील/अंबरनाथ
बदलापूर: बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गाव गुंडांनी गोळीबार देखील केला. मात्र या गोळीबारातून हा तरुण थोडक्यात बचावला. पोलिसांना टीप देत असल्याचा संशय मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे संबंधित तरुणाने स्पष्ट केले आहे.
बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान असून तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने आपल्या सहकाऱ्यांसह येत होता. बदलापूर गावाच्या वेशीवरच दोन गाड्यांमधून आलेल्या अमन सिंग, सचिन खंडागळे, शेखर गडदे, पाठक बिल्डर, लक्ष्मण नवगिरे, रावत्या आणि इतर तीन ते चार जणांच्या गटाने कैफ याच्यावर तलवार आणि चॉपरने हल्ला चढवला. या हल्ल्यातून कैफ आणि त्याच्या इतर साथीदारांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी हल्लेखोरांपैकी एकाने कैफच्या दिशेने गोळीबार देखील केला. मात्र ही गोळी चुकल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी हल्लेखोरांच्या काही साथीदारांना बेकायदेशीर बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची टीप कैफ यांनी दिल्याचा संशय हल्लेखोर यांच्या मनात होता. त्याच संशयातून हल्लेखोरांनी कैफ याला मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार प्रमुख आरोपांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत