हॉटेल मालकासह वेटरांनी केली जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना मारहाण
By रोहित टेके | Published: April 1, 2023 02:26 PM2023-04-01T14:26:51+5:302023-04-01T14:27:26+5:30
येसगावातील घटना : हॉटेल मालकासह दोन वेटरवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव (जि. अहमदनगर ): एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी जेवण करण्यासाठी गेलेल्या सात मित्रांनी दिलेल्या ऑर्डर ऐवजी वेटरने दुसरीच ऑर्डर आणली. त्याचा हॉटेल मालकाला जाब विचारल्याने हॉटेल मालकास राग आल्याने त्याने व दोन वेटर यांनी ग्राहक म्हणून आलेल्या सात तरुणांना शिवीगाळ व लोखंडी गजासह लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे प्रमाणात नुकसान केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील हॉटेल प्रियंकामध्ये शुक्रवारी (दि.३१ मार्च ) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत वृषभ रवींद्र कास्टे, अमोल सुभाषराव दराडे, सार्थक योगेश उपाध्ये, रोहीत अनिल शिंगारे, पवन तिपयाले, ओमकेश काळुंखे, अक्षय कदम हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी वृषभ रवींद्र कास्टे (वय २५, धंदा-खा. नोकरी, रा. संघ बिल्डींगच्या मागे, बडकास चौक, महाल नागपुर, जि. नागपुर, ह. मु. कोपरगाव ता. कोपरगाव ) याच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक सुनिल देवीदास लासणकर ( रा. येसगाव ता. कोपरगाव ) व हॉटेल प्रियंका मधील दोन वेटर ( नाव व पत्ता माहित नाही ) यांच्यावर शनिवारी (दि. १ )पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्याचे मित्र येसगाव शिवारातील हॉटेल प्रियंका येथे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवन करण्यासाठी गेले होते. ते हॉटेलमध्ये जेवन करीत असताना रात्री साडेदहा वाजता हॉटेलचा वेटर रोट्या घेऊन आला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास हॉटेलच्या मालकास बोलावण्यास सांगीतले. त्यावर हॉटेल मालक सुनिल देवीदास लासनकर त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांनी भाकरीची ऑर्डर दिली होती तुम्ही रोट्या का दिल्या असे विचारले. त्यावर हॉटेल मालक लासनकर म्हणाला आता हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे. आम्ही रोट्या तयार केल्या आहे. ही ऑर्डर कॅन्सल होणार नाही असे म्हणुन त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
फिर्यादी व त्यांचे मित्र त्यास समजावुन सांगत असताना हॉटेल मालकाने जवळच पडलेल्या लोखंडी गजाने दोन्ही पायावर, हातावर मारहाण केली. तसेच दोन मोटार सायकलच्या खोपडी फोडुन नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे करीत आहेत.