जिवंत पतीला मृत दाखवत पत्नीनं तब्बल १० वर्ष सरकारला फसवलं, मग...; काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:08 PM2022-02-03T15:08:06+5:302022-02-03T15:08:41+5:30
आरोपी महिलेचं लग्न २००१ मध्ये अशोक नगरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद अख्तर राईन खान यांच्याशी झालं होतं
मध्य प्रदेशातील सागर येथील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एक महिला तिच्या जिवंत पतीला मृत दाखवून विधवा म्हणून पेंशन घेत होती. त्याचसोबत महिलेने बीपीएम कार्डही बनवलं. परंतु ही गोष्ट समोर येताच पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेवर विविध गुन्ह्यातंर्गत पोलिसांनी अटक करुन तिला जेलमध्ये पाठवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं पतीला कागदोपत्री मृत दाखवून मागील १० वर्षापासून विधवा म्हणून पेंशन घेत आहे. केशवगंज वार्ड येथे राहणारी आरोपी महिलेचं लग्न २००१ मध्ये अशोक नगरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद अख्तर राईन खान यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर अख्तर आणि त्याची बायको सागर जिल्ह्यात राहत होते. परंतु कौटुंबिक वादामुळे पती अशोक नगरला पुन्हा राहायला आला. २०१७ मध्ये अख्तरनं अशोक नगर पोलीस ठाण्यात पत्नी शमीम विरोधात तक्रार दाखल केली.
पेंशनसाठी पत्नी बनली बोगस विधवा
अख्तरनं त्याच्या तक्रारीत म्हटलंय की, पत्नी शमीमनं बनावट कागदपत्रे दाखवत शासन योजनेचा लाभ घेत आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार गोपालगंज सागर येथे पथक पाठवलं. तेव्हा तपासानंतर पोलिसांनी शमीमविरुद्ध फसवणूक आणि अन्य आरोपाखाली गुन्हा दाखल केला. हे प्रकरण २०१७ मधील आहे. मोहम्मद अख्तर राइननं तक्रार करत गोपालंगजमध्ये त्याच्या पत्नीनं बनावट कागदपत्रे बनवल्याचं म्हटलं. ज्यात पतीला मृत दाखवून विधवा पेंशन आणि बीपीएल कार्डातून रेशन घेत आहे अशी माहिती तपास अधिकारी संगीता सिंह यांनी दिली.
महिलेला जेलमध्ये पाठवलं
महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरुच होता. फोटो वेरिफिकेशनच्या माध्यमातून महिलेचा पती जिवंत असल्याचं समोर आलं. त्यानंतर कलम ४२० दाखल करण्यात आले. तसेच या कागदपत्राच्या आधारे ४६७, ४६८ सरकारी कागदपत्रे बनावटपणे तयार करुन संबंध सरकारी पेंशनचा लाभ उचलणे या आरोपाखालीही महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन कोर्टासमोर हजर केले. तेव्हा कोर्टाने महिलेला जेलमध्ये पाठवलं.