पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 09:33 PM2022-04-11T21:33:02+5:302022-04-11T21:33:39+5:30
Shot dead : छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली.
एका इसमाची पत्नी सोडून गेली म्हणून महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने देखील लग्नास नकार दिला. तिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय इसमाला आला. यातूनच त्याने महिलेवर गोळी झाडून हत्या केली. यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. छगन बंजारा (३०) आणि ममता (२३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, छगन आणि ममता हे एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत होते. दोघेही एकच काम करीत होते. छगन विवाहित असून, दोन मुलं आहेत. छगनच्या त्रासाला कंटाळून पत्नी सोडून गेली. यादरमम्यान ममताला भेटल्यानंतर छगन तिच्या प्रेमात पडला. त्याला ममतासोबत लग्न करायचे होते. मात्र, ममता आणि तिच्या आईला हे मान्य नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. ममताचे सुद्धा दोनदा लग्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मात्र, दोन्ही पतींपासून विभक्त झाल्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती.
छगनने लग्नाची मागणी घातल्यानंतर ती सतत नकार देत होती. छगनला ममताचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून त्याने ममताला अनेकदा दम भरला. तसेच लग्नाचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी दबाव टाकत होता. छगन रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुभाषनगर येथील ममताच्या घरी आला. यावेळी ममता कुटुंबीयांसोबत जेवण करीत होती. छगनच्या हातात बंदूक पाहून ममताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, छगनने तिला पकडले आणि गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने ममता तिथेच कोसळली. यानंतर छगनने स्वत:वरही गोळी झाडली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ममताला मृत घोषित केले आणि छगनला जोधपूरला रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान छगनचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.