महिलेला वेश्या म्हणून हिणवून केले मुंडन, चेहरा काळा करून गावात काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:06 PM2022-02-17T15:06:36+5:302022-02-17T15:07:26+5:30
Harrassment Case : यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत.
दरभंगा - बिहारमधील दरभंगामध्ये एका महिलेला वेश्या म्हणून हिणवून तालिबानी शैलीत शिक्षा करण्यात आली आहे. दरभंगाच्या कुशेश्वरस्थान पश्चिम ब्लॉकमधील पाकही झाझरा पंचायतीच्या छपकाही गावात एका महिलेला तालिबानी शैलीत शिक्षा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावातील लोकांनी महिलेच्या डोक्यावरचे केस कापून मुंडन केले, तसेच चेहऱ्याची एक बाजू काळ्या रंगाने रंगवून तिची गावातील रस्त्यावरून धिंड काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत.
लोक आधी त्या महिलेला गावात घेऊन जातात, नंतर तिला गावाच्या हद्दीबाहेर सोडले जाते. यादरम्यान कोणी काय दोष विचारला तर तरुणाने त्या महिलेला वेश्या म्हणून संबोधले. हा संपूर्ण व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत गावात पंचायतही झाली, त्यात ही घटना दडपण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला त्याच गावातील सून असून तिला चारित्र्यहीन ठरवून हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकीदारापासून ते पोलीस ठाण्याच्या स्तरापर्यंत माहिती असल्याचे बोलले जात आहे, मात्र आजतागायत प्रशासकीय स्तरावर कोणतीही कारवाई झालेली नाही.