एकतर्फी प्रेमातून युवकानं प्रेयसीच्या अल्पवयीन भावाला संपवलं; नाशिकमधील प्रकार
By अझहर शेख | Published: September 11, 2022 05:40 AM2022-09-11T05:40:44+5:302022-09-11T05:41:12+5:30
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिकानगरमध्ये राहणारा रवी सय्यद हा मोलमजुरीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
नाशिक : एकतर्फी प्रेमापोटी प्रियकराने भेटण्यासाठी बळजबरी करत काही दिवसांपुर्वी धमकावले होते. यानंतर संशयिताने चॉपरने प्रेयसीच्या १७वर्षीय भावावर पंचवटीतील कालिकानगरमध्ये शनिवारी (दि.९) रात्री हल्ला चढविला. वर्मी घाव बसल्याने रवी सलीम सय्यद (१७) याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिकानगरमध्ये राहणारा रवी सय्यद हा मोलमजुरीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे वडील सलीम सय्यद हे गोदाकाठ परिसरात आले असताना रवी हा गल्लीत बसलेला हाेता. यावेळी दोघे संशयित हल्लेखोर तेथे आले व त्यांनी जुन्या वादाची कुरापत काढत रवीवर चॉपरसारख्या धारधार शस्त्राने हल्ला चढविला. ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर जखमी अवस्थेत रवी यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रवी यास तपासून मयत घोषित केले.
रवीच्या कमरेच्या बाजूने पोटात शस्त्राचा वर्मी घाव लागला. संशयितांना जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका नातेवाईकांनी घेतली. नातेवाईक महिला व परिसरातील रवीचे मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली. संशयित हल्लेखोरांच्या शोधार्थ त्वरित पंचवटी गुन्हे शाेध पथकासह मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक रवाना झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला.