दारूच्या व्यसनासाठी तरूणाने पत्करला चोरीचा मार्ग, अखेर झाली अटक
By प्रशांत माने | Published: February 5, 2023 04:45 PM2023-02-05T16:45:02+5:302023-02-05T16:46:01+5:30
घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी १२ तासात गजाआड
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीला १२ तासात बेडया ठोकण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. किशन कारले (वय २८) असे आरोपीचे नाव असून दारूचे व्यसन भागविण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या कुटुबांचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे पण दारूचे व्यसन जडल्याने ते भागविण्यासाठी पैसा मिळविण्याच्या दृष्टीने त्याने घरफोडीचा गुन्हा केला. त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
बुधवारी मध्यरात्री पुर्वेकडील अच्युत निवास येथे राहणा-या श्रध्दा म्हाप्रळकर यांच्याकडे चोरी झाली होती. श्रध्दा या बुधवारी नांदीवली येथे राहणा-या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे बंद घराचे कुलुप तोडून चोरटयाने घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गुरूवारी संध्याकाळी त्या घरी परतल्या असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. त्यांनी याप्रकरणी रामनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.
या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड, निलेश पाटील हे करीत होते. तपासात गुन्हा घडलेल्या इमारतीच्या आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता चोरटयाचा चेहरा कैद झाला होता. त्यात गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी किशनला गुरूवारी रात्री १२ वाजता अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले ६० हजार रूपयांचे दागिने आणि दोन हजार रूपयांची रोकड जप्त केल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली.