रेल्वेत टीसीची नोकरी देण्याचे सांगून तरुणास १२ लाख ४० हजारांना गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:16 PM2023-04-24T23:16:44+5:302023-04-24T23:17:17+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याचे आमिष देऊन तरुणास १२ लाख ४० हजारांना फसवल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी एकास अटक केली असून चौघांचा शोध सुरु आहे . आरोपींनी तरुणास टी सी चा गणवेश पासून बनावट नियुक्तीपत्र सुद्धा दिले होते .
कांदिवलीच्या पोईसर भागात राहणाऱ्या भरत नारायण झा वय २८ वर्ष युवकाला थेट पद्धतीने रेल्वेत टि. सी. ची नौकरी लावतो सांगून असे त्यावेळी काशीमीराच्या मुन्शी कंपाउंड मध्ये राहणाऱ्या समीर कादरी याने २०१८ सालात सांगितले होते . त्यावेळी समीर ने दिड लाख रुपये टोकन म्हणून घेतले .
झा याला लखनौच्या रेल्वे मेडिकल सेंटर येथे बोलावून तेथील खान नावाच्या इसमाने वॉर्ड बॉय मार्फत रक्ताचे नमुने तपासणी साठी घेतले . मेडिकल मध्ये पास झाल्याने पुढील कार्यवाही करिता समीर याने आणखी २ लाख घेतले . त्या नंतर रेल्वेत नोकरीसाठी विविध कारणांनी वेळोवेळी समीर सह खान , पांडे , सौरभ उर्फ मनोज यादव , धीरजकुमार सिंग यांनी एकूण १२ लाख ४० हजार उकळले .
झा याला उत्तर प्रदेश, दिल्ली येथे अनेक खेपा मारायला लावून रेल्वेच्या विविध कार्यालय परिसरात बोलावले . त्याला बनावट नियुक्ती पत्र , ओळखपत्र देण्या पासून टी सी चा गणवेश सुद्धा दिला . मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर झा याच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल चव्हाण व पथकाने ठाण्याच्या कासारवडवली येथे रहात असलेल्या समीर कादरी याला अटक केली . तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे . तर उर्वरित चार आरोपींचा पोलीस शोध घेत असून ते उत्तर प्रदेश , बिहार आदी भागात असल्याचे सांगितले जाते .