'मी बलात्कार केला नाही' अशी सुसाईड नोट लिहून युवा खेळाडूने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:25 PM2022-06-29T12:25:10+5:302022-06-29T12:42:37+5:30
Athlete commited suicide by write suicide note : पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका नवोदित खेळाडूच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. भैसीमध्ये रायपूर नागली गावात राहणाऱ्या २३ वर्षीय राहुलने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली काढला असता त्याच्या खिशातून सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
राहुल हा एक युवा खेळाडू होता, ज्याने आपल्या तरुण वयात देश-विदेशात अनेक पदके जिंकली होती. दिल्लीत राहून तो ऑलिम्पिकची तयारी करत होता. यादरम्यान दिल्लीतील एका मुलीच्या नातेवाईकांनी राहुलविरुद्ध मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुलला त्याच्या गावातून अटक केली होती. सुमारे 19 महिने तो तुरुंगात होता आणि महिन्याभरापूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता.
सुसाईड नोटमध्ये वेदना व्यक्त केल्या आहेत
सुसाईड नोटमध्ये राहुलने लिहिले की, 'माझे जीवन व्यर्थ झाले आहे. मला खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवल्यापासून मी नैराश्यात आहे. मी काही चुकीचे केले नाही. ती मुलगी फक्त माझी मैत्रीण होती. तिने मला नोकरीसाठी बोलावले. तरीही मुलीच्या आई-वडिलांनी मला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले. १९ महिने तुरुंगात राहिल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आता मला सरकारी नोकरीही मिळणार नाही. तुरुंगात गेल्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. मला माफ कर! यात माझ्या कुटुंबाचा दोष नाही. मी जे काही करत आहे, ते माझ्या स्वेच्छेने करत आहे. मात्र, मुलीच्या पालकांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांनी मला पैशासाठी खोटे ठरवले. बाबा मला माफ करा. माझं स्वप्न मोठं ऍथलीट होण्याचं होतं. मी पण खूप मेहनत घेतली. देश-विदेशात अनेक पदके जिंकली, पण माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी बलात्कार केला नाही. या मुलीनेही मला काहीही झाले नसल्याचे म्हटले आहे. तरीही मला शिक्षा झाली. मी या कलंकासह जगू शकत नाही. प्रत्येकजण माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहे. मी कोणाशीही बोलू शकलो नाही. म्हणूनच मी माझे जीवन संपवत आहे. माफ करा, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.
राहुलचे वडील मुकेश कुमार यांनी सांगितले की, तो खूप डिप्रेशनमधून जात होता. मुलीचे आई-वडील तिला पैशासाठी ब्लॅकमेल करत होते. महिनाभरापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. दिल्लीत राहून तो ऑलिम्पिकची तयारी करत होता. मुलीच्या पालकांनी एफआयआर करून घेतला होता. सुसाईड नोटमध्ये मुलीच्या पालकांनी तिच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. ते पैशाची मागणी करत होते. यापूर्वीही आम्ही दहा लाख दिले होते. या संदर्भात आम्ही खतौली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मुझफ्फरनगरचे एसपी सिटी अर्पित विजयवर्गीय सांगतात की, सोमवारी एका तरुणाने खतौली पोलीस स्टेशन परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह झाडावरून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मृत व्यक्तीने कोणाचा उल्लेख केला आहे याचा तपास करत आहोत. चौकशीच्या आधारे कारवाई केली जाईल.