'अल्लाह हू अकबर' नारा देत युवक गोरक्षनाथ मंदिरात घुसला; सुरक्षा जवानांवर हल्ला केला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:53 PM2022-04-04T14:53:28+5:302022-04-04T14:54:20+5:30
गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिरात झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनात खळबळ माजली
गोरखपूर – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिरात रविवारी संध्याकाळी ७ वाजता घडलेल्या एका घटनेने सगळ्यांची झोप उडवली आहे. याठिकाणी मंदिराच्या गेटमधून एक युवक वेगाने धावत येऊन सुरक्षेसाठी तैनात असलेला जवान गोपाळच्या हातातून शस्त्र हिसकावून घेऊ लागला. सुरक्षा जवानाला काही कळायच्या आत या युवकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला सुरू केला. हा गोंधळ सुरू असताना इतर जवान मदतीला धावले तर हल्लेखोर युवकाने त्या जवानांनाही जखमी केले.
काही वेळेत मंदिरावर हल्ला झाल्याचं कळताच सर्व सुरक्षा जवान घटनास्थळी धावले. तेव्हा हल्लेखोर युवक जोरजोरात अल्लाह हू अकबर नारे देऊ लागला. खूप प्रयत्नानंतर जवानांनी हल्लेखोर युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मंदिराच्या सायकल स्टॅँडजवळ त्याला घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहचले. या संपूर्ण प्रकाराने मंदिर परिसरात भाविकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरल्याचं दिसून आले.
काय आहे प्रकरण?
गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिरात झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. हा हल्लेखोर युवक कुठल्या दहशतवादी संघटनेचा आहे की नाही याची पुष्टी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीचं नाव अहमद मुर्तजा असून तो गोरखपूरचा रहिवासी आहे. मुर्तजाने आयआयटी मुंबईतून इंजिनिअरींग केली आहे. सुरक्षा जवानांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो वारंवार मला गोळी मारा असं ओरडून सांगत होता. या झटापटीत हल्लेखोर युवकही गंभीर झाला. त्यानंतर या युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मुर्तजाने सांगितले की, त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आहे. नोकरीही हातातून गेली. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली आहे. अनेक रात्रं झोपला नाही. त्यामुळे मला गोळी मारावी यासाठी गोरक्षनाथ मंदिराच्या सुरक्षा जवानांवर हल्ला केला. परंतु या प्रकरणाचं नेमकं सत्य काय? याबाबत पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोराकडून धारदार शस्त्र, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप आणि विमानाचं तिकीट जप्त करण्यात आले आहे. मुर्तजासोबत अन्य लोकांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस सध्या शोधमोहिम घेत आहेत. आरोपीच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे.