ब्लॅकमेल करून तरुणाने पीडितेवर केले लैंगिक अत्याचार; सांगलीत आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:12 AM2024-10-21T00:12:42+5:302024-10-21T00:12:42+5:30
सांगली-मिरजेतील कॅफेमध्ये युवतीवर लैंगिक अत्याचार, संशयित तरुणास अटक; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
घनशाम नवाथे
सांगली - महाविद्यालयीन युवतीस फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन सांगली आणि मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अरिहंत संजय छंचुरे (वय १९, रा. बजरंगनगर कुपवाड ) याला अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध लैंगिक अत्याचार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पीडित युवती ही महाविद्यालयात शिक्षण घेते. अरिहंत याने तिच्याशी ओळख वाढवून मैत्री केली. दोघेजण एकमेकाला भेटू लागले. अरिहंत याने तिला ‘कॅफे’मध्ये नेले. तिच्यासोबत काही फोटो काढले. त्यानंतर फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत दि. २० नोव्हेंबर २०२३ पासून सांगलीतील कॅफे डिलाईट आणि मिरजेतील कॅफे सन राईज वेळोवेळी तिला बोलवले. तेथे तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. दि. १६ ऑक्टोबर रोजी अरिहंत याने सोशल मीडियावरून पीडिताचे फोटो सर्वांना दिसेल अशा पद्धतीने ‘स्टोरी’ इन्स्टाग्रामवर ‘व्हायरल’ केली. पीडितेस हा प्रकार समजताच तिने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. अरिहंत याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी संशयिताला त्वरित अटक केली आहे. विश्रामबाग पोलिस तपास करत आहेत.
कॅफेमध्ये अत्याचाराबद्दल तिसरा गुन्हा
सांगलीतील कॅफे म्हणजे ‘मिनी लॉज’ बनले असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. एका कॅफेमध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने काही कॅफे फोडले होते. त्यानंतर आठवड्यापूर्वी आणखी एका कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद युवतीने दिली. त्यानंतर सांगली-मिरजेतील कॅफेमध्ये अत्याचार झाल्याबद्दल तिसऱ्यांदा गुन्हा दाखल झाला आहे.
कॅफेचालक सहआरोपी होणार
कॅफेमधील अत्याचारप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चालकास सहआरोपी केले होते. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी केली. आता तिसऱ्यांदा सांगली-मिरजेतील कॅफेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे यातही चालकास सहआरोपी केले जाण्याची शक्यता आहे.