भयावह! तरुणाला रात्रभर जळत्या लाकडाने केली मारहाण; १६ तास मंदिरात ठेवले ओलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:02 AM2023-01-14T11:02:23+5:302023-01-14T11:02:40+5:30
२२ वर्षांचा आयुष मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला होता.
देहरादून : उत्तराखंडमध्ये एका मागासवर्गीय तरुणाला मंदिरात जाण्याची भयंकर शिक्षा देण्यात आली. ग्रामस्थांनी त्याला दोरीने बांधून रात्रभर जळत्या लाकडांनी बेदम मारहाण केली. उत्तरकाशी जिल्ह्यातील सालरा गावात ९ जानेवारी रोजी ही घटना घडली.
२२ वर्षांचा आयुष मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला होता. त्याला मंदिरात पाहून उच्चवर्णीय तरुण संतापले. त्यांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. नंतर दोरीने बांधले आणि रात्रभर जळत्या लाकडाने मारझोड केली. त्याला १६ तास मंदिरात ओलीस ठेवण्यात आले. पीडित तरुणाच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांनाही जुमानले नाही. त्यांनी वडिलांसमोरच आयुषचे कपडे फाडले.
झाले काय?
आयुषने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर १० रोजी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला वरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मागासवर्गीय असतानाही मंदिरात प्रवेश केला म्हणून उच्चवर्णीय तरुण नाराज होते. उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, आयुषच्या तक्रारीवरून पाच गावकऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी कुमार हे तपास करत आहेत.