छत्री खरेदीच्या बहाण्याने 'असा ' घातला १ लाख ६५ हजारांना गंडा,पुण्यातल्या सहकारनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:55 PM2020-07-27T15:55:55+5:302020-07-27T15:57:25+5:30
एका छत्री विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिघांनी चक्क पावणे दोन लाख लंपास केले.
पुणे : पाऊस कधीही पडेल असे वातावरण होते. अशा दुपारच्यावेळी एक जण दुकानात येतो छत्री खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानाच्या बाहेरच्या बाजूला लावलेल्या छत्र्या दाखविण्यासाठी दुकानदाराला बोलावतात. काही वेळाने तो निघून जातो.दरम्यान, दुकानदाराच्या गल्ल्यातील १ लाख ६५ हजार रुपये व पाऊच लंपास झालेले असतो.
सहकारनगर नंबर २ मधील गोळवलकर पथावरील तुलसी व्हरायटीमध्ये रविवारी दुपारी सव्वा तीन वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी महेंद्र चौधरी (वय २१,रा. धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे तुलसी व्हरायटी हे दुकान आहे़ दुकानाच्या बाहेर विक्रीसाठी छत्र्या टांगून ठेवलेल्या असतात. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एक जण छत्री खरेदी करण्यासाठी आला. त्याने चौधरी यांना वेगवेगळ्या छत्र्या उघडून दाखविण्यास सांगितल्या. चौधरी यांना बाजूचे दिसणार नाही, अशा पद्धतीने छत्री उघडून त्यांच्यासमोर धरली.त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार दुकानाच्या आत गेला. त्याने गल्ल्याच्या खालील कप्यामधून १ लाख ६५ हजार रुपये व पाऊच काढून घेतला़ दरम्यान चौधरी यांचा भाऊ लघुशंकेसाठी तो परत येत होता. तेव्हा त्याला तिसऱ्याने वाटेतच अडविले व हा रस्ता कोठे जातो, अशी चौकशी करत बोलण्यात गुंतविले. इकडे पहिली व्यक्ती छत्री न घेताच परत गेली. त्यानंतर महेंद्र चौधरी हे परत आपल्या जागेवर येऊन बसले.काही वेळाने त्यांना गल्ल्यातील पैसे व पाऊच लंपास झाल्याचे लक्षात आले. पाऊचमध्ये वडिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टेट बँक व बँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड, दुचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स अशा वस्तू होत्या. यासाठी आपल्या त्यांच्याच साथीदारांनी दुकानात येऊ नये, म्हणून रस्ता विचारण्याचा बहाणा केल्याचे त्यांच्या भावाच्या लक्षात आले. या ठिकाणी सीसीटीव्ही आढळून आले नाहीत. पोलीस हवालदार एन. पी.पवार अधिक तपास करीत आहेत.