७० गाढवांची चोरी, मालक पोलिसांच्या दारी, आता गल्लीबोळात पोलीस घेताहेत गाढवांचा शोध  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:47 PM2021-12-29T15:47:40+5:302021-12-29T15:48:08+5:30

Jara Hatke News: राजस्थानमधील हनुमागडमध्ये गाढवांच्या चोरीची एक अजब घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुईयां पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही काळात तब्बल ७० गाढवे चोरीस गेली आहेत.

Theft of 70 donkeys, owner at the door of police, now the police are searching for donkeys in the streets | ७० गाढवांची चोरी, मालक पोलिसांच्या दारी, आता गल्लीबोळात पोलीस घेताहेत गाढवांचा शोध  

७० गाढवांची चोरी, मालक पोलिसांच्या दारी, आता गल्लीबोळात पोलीस घेताहेत गाढवांचा शोध  

googlenewsNext

जयपूर - राजस्थानमधील हनुमागडमध्ये गाढवांच्या चोरीची एक अजब घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुईयां पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही काळात तब्बल ७० गाढवे चोरीस गेली आहेत. मात्र या चोरीच्या तक्रारींकडे पोलिसांनी लक्ष न दिल्याने गाढवांच्या मालकांनी आणि माकपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळावारी थेट पोलीस ठाण्यावर धडक देऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ कार्यरत झाली असून, गल्लीबोळात, गावागावात पोलिसांकडून गाढवांचा शोध घेतला जात आहे.

या शोधमोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री पोलिसांनी १५ गाढवांना पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र आंदोलक मालकांनी ही गाढवे त्यांची नसल्याचे सांगत आम्हाला आमची गाढवं शोधून द्या, अशी मागणी लावून धरली. आता त्रस्त झालेले पोलीस या गाढवांना घेऊन जावे यासाठी मालकांची मनधरणी करत आहेत. मात्र आम्ही आमचीच गाढवं घेऊन जाऊ, या मागणीवर मालक अडून बसले आहेत. त्यामुळे आता या आंदोलकांची समजूत कशी घालावी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

गाढवांच्या चोरीवरून आंदोलन वाढल्यावर पोलिसांनी कसेबसे १५ गाढव पकडून आणले. त्यानंतर गाढवांच्या मालकांना ती गाढवे नेण्यास सांगितले. मग या गाढवांचे मालक त्यांना चिंटू, पिंटू, कालू या नावांनी हाका मारू लागले. मात्र गाढवांकडून प्रतिसाद येईना. तेव्हा या मालकांनी ही आमची गाढवं नाहीत, त्यांना जिथून आणलं तिथे सोडा, असं चोरीस गेलेल्या गाढवांच्या मालकांनी सांगितलं.

गाढवांच्या मालकांनी सांगितले की, ही गाढवं त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. एका गाढवाची किंमत सुमारे २० हजार रुपये एवढी आहे. अशाप्रकारे ७० गाढवांची किंमत तब्बल १४ लाख रुपये एवढी होते. ही गाढवं ओझे वाहून नेण्याचे काम करतात. मात्र ही गाढवे चोरीला गेल्याने आमच्या उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. दरम्यान, पोलिसांनी या गाढवांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.  

Web Title: Theft of 70 donkeys, owner at the door of police, now the police are searching for donkeys in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.