बॅगेतील ३५ लाख रुपये पळवणाऱ्या चोरट्याला गुजरातमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 09:33 PM2019-12-02T21:33:08+5:302019-12-02T21:34:16+5:30
चोरटा हा मध्यप्रदेशमधील असून यापूर्वीही त्याला अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
पणजी: पणजीतील गास्पर डायस सभागृहातील लग्न सोहळ्यास ३५ लाख रुपये किंमतीच्या दागिन्याची बॅग पळविणाºया चोरट्यास पणजी पोलिसांनी गुजरात येथून पकडून आणले आहे. चोरटा हा मध्यप्रदेशमधील असून यापूर्वीही त्याला अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
संशयिताचे नाव सावंत सिसोदिया असे असून तो मूळचा मध्यप्रदेश येथील आहे. पणजी पोलिसांचे एक पथक संशयिताचा शोध घेत गुजरात येथे पोहोचले होते. तेथून रात्री त्याला ताब्यात घेऊन त्याला गोवण्यात आणले. गोव्यात आणून त्याला अटक करण्यात आली आहे. नंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नेऊन ५ दिवसाची पोलीस कोठडीही घेण्यात आली आहे.
सावनने दागिन्याच्या चोरीची कबुली दिली आहे, परंतु अद्याप त्याच्याकडून दागिने मिळविण्यास पोलिसांना यश आलेले नाही. दागिने आपल्याकडे नाहीत एवढे त्याने पोलिसांना सांगितले. ते कुठे ठेवले आहेत याची माहिती काढून घेण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. तसेच चोरी करण्यासाठी ज्या मुलाचा वापर करण्यात आला तो मुलगा नेमका कोण याची माहितीही तो सारखी देत नाही. तो गोव्याबाहेरचा मुलगा आहे एवढे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान हा माणूस सराईत गुन्हेगार असून अशा प्रकारचे आणखी गुन्हे त्याने यापूर्वी त्याने केले असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांकडून गोवा पोलिसांना मिळाली आहे. तसेच त्याच्या विरुद्ध दिल्लीतही गुन्हे नोंद झाल्याच्याचे सांगितले जाते.
असा लावला पत्ता
३५ लाख रुपये किंमतीच्या दागिन्याची बॅग ही ८ वर्षे वयाचा मुलगा पळवितो एवढेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. त्यानंतर ही संपूर्ण फुटेज पाहिली असता तो मुलगा एका पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीसोबत खुर्चीवर बसलेला पोलिसांना आढळला. आणखी शोध घेतला असता तोच पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती लग्नसमारंभातच आणखी एका ठिकाणी त्या मुलाबरोबर असलेला पोलिसांना दिसला. त्या पांढºया शर्टवाल्याचा फोटो मिळवून त्याचा पोलीस खात्याच्या विशेष क्राईम ट्रेसिंग सिस्टमद्वारे शोध सुरू केला. या सीस्टमद्वारे संशयिताचे छायाचित्र देशातील सर्व राज्यातील पोलीसांना पाठविले जाते. मध्यप्रदेश पोलिसांकडून या व्यक्तीची त्याच्या आधारकार्ड क्रमांकासह सर्व माहिती गोवा पोलिसांना मिळाली. तो गुजराथमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पणजी पोलिसांचे पथक गुजराथला रवाना झाले आणि रविवारी मध्यरात्रीला त्याला गाठलेही. सोमवारी त्याला गोव्यात आणले.