पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटले, पावणे चार लाखांची रोकड पळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:00 PM2018-10-08T16:00:19+5:302018-10-08T16:01:36+5:30
पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ लाख ७० हजारांची रोकड लुटली.
तळेगाव स्टेशन : पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ लाख ७० हजारांची रोकड लुटली. ही घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.८) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव आंबी रस्त्यावर इंद्रायणी पुलाजवळ घडली.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंब्रे येथे निवृत्ती शेटे यांचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर जमा झालेली रोकड पंपावरील कॅशियर आणि कर्मचारी असे दोघेजण पंजाब नॅशनल बँकेत जमा करण्यासाठी जात होते. तळेगाव आंबी रस्त्यावर इंद्रायणी पुलाजवळ असलेल्या साईरंग ढाब्यासमोर एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि ३ लाख ७० हजार रुपयांची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. के. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल भोसले, पोलीस हवालदार सीताराम भवारी, विठ्ठल काळे, करीत आहे.