खरेदीच्या बहाण्याने महिला चोरट्यांचा कापड दुकानावर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:04 PM2018-11-01T17:04:13+5:302018-11-01T17:11:52+5:30
दिपावलीच्या गर्दीचा फायदा घेत कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ल्या मारला.
तळेगाव दाभाडे: दिपावलीच्या गर्दीचा फायदा घेत बुधवारी दुपारी येथील मुख्य बाजारपेठेतील गोकुळ कलेक्शन या कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ल्या मारला. मात्र दुकानदार, कर्मचारी यांची सतर्कता आणि सीसीटीव्हीमुळे चोरट्यांचा हा डाव उधळला गेला.
या संदर्भात दुकानाचे मालक रुपेश मनुभाई मेहता(वय ४८,रा.तळेगाव दाभाडे,ता.मावळ)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार (एमएच ४५.एन.६५२२)जप्त केली असून दोन महिलांसह स्विफ्ट चालकास अटक केली आहे.सुरुवातीला चोरट्या महिलांनी एका अल्पवयीन साथीदार मुलीच्या सहाय्याने मौल्यवान तीन साड्या चोरून दुकानालगत उभ्या केलेल्या स्विफ्ट मोटारीच्या डिकीत ठेवल्या.अजून पाच मौल्यवान साड्या चोरत असताना दुकानदार व कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवू नका अशी विनवणी चोरट्या महिला दुकानदार मालकाकडे करत होत्या. महिला चोरट्यांनी साड्या परत करून चक्क कार्ड द्वारे ५० हजार रुपये देण्याचेही कबुल करत होत्या.मात्र दुकानदार रुपेश मेहता यांनी घटनेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान दाखवत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी दुपारी १.५० ते २ यावेळात चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या महिला कुर्डवाडी, सोलापूर येथील असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे करत आहे.