बोकडांची चोरी, पशुपालकाला ६० हजारांचा फटका, नांद्रा बुद्रुक येथील घटना
By विजय.सैतवाल | Published: September 11, 2023 03:21 PM2023-09-11T15:21:14+5:302023-09-11T15:22:12+5:30
श्रावण मास संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना चोरट्यांनी बकऱ्या व बोकड चोरून नेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जळगाव : गोठ्यामध्ये बांधलेल्या नऊ बकऱ्या व ११ बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे ९ सप्टेंबर रात्री ते १० सप्टेंबरच्या सकाळपर्यंत घडली. श्रावण मास संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना चोरट्यांनी बकऱ्या व बोकड चोरून नेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील नांद्रा बुद्रुक गावात चांदसर रस्त्यावर विजय श्रावण बाविस्कर व रवींद्र प्रकाश वाघ या पशुपालकांचा गोठा आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी त्यांच्या मालकीच्या बकऱ्या व बोकड गोठ्यात बांधले होते. त्यानंतर रात्रीपासून ते १० सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत अज्ञात चोरट्याने नऊ बकऱ्या व ११ बोकड चोरून नेले.
सकाळी पशुपालक गोठ्यात गेले असता त्यांना बकऱ्या व बोकड दिसले नाहीत. त्यांनी सर्वत्र विचारपूस करीत शोध घेतला. मात्र, एकही बकरी वा बोकड सापडला नाही. यात पशुपालकांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी विजय बाविस्कर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. ईश्वर लोखंडे करीत आहेत.