लॉकडाऊनमुळे दुचाकीचे थकलेले हफ्ते फेडण्यासाठी तरुणाने केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:41 PM2020-06-27T19:41:08+5:302020-06-27T19:42:38+5:30
अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरला मोबाइल
पिंपरी : लॉकडाऊन दरम्यान दुचाकीचे हफ्ते फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे हफ्ते फेडण्यासाठी पादचाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावून तरुणाने अल्पवयीन साथीदारासह चोरीचा गुन्हा केला. वाकड पोलिसांनी या तरुणाला जेरबंद केले.
गुड्डू सलीम पठाण (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, गणराज कॉलनी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बजरंगलाल श्रीनिवास भंग (वय ३०, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगलाल भंग हे १० जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शुभम डेअरी, रहाटणी येथून पायी जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अनोळखी आरोपी यांनी बजरंगलाल भंग यांच्या हातातील मोबाइल फोन हिसकावून पळून गेले. याबाबत बजरंगलाल भंग यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ही चोरी पठाण याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पठाण याचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पठाण यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील चोरलेला आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपयांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. आरोपी पठाण याने हफ्त्यावर दुचाकी विकत घेतली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये या दुचाकीचे हप्ते फेडणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे हप्ते फेडण्यासाठी त्याने मोबाईल चोरला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषन कन्हेरकर, सचिन नरुटे, नितीन गेंगजे, शाम बाबा, बापुसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, तात्या शिंदे, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, जावेद पठाण, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, सुरेश भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.