धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:05 PM2019-11-16T22:05:12+5:302019-11-16T22:06:50+5:30
चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक इंगळे (२४) रा. गणेश मंदिराजवळ, बडकस चौक असे प्रवाशाचे नाव आहे. त्याचे शिक्षण सुरू आहे. तो संगीत क्षेत्राशी निगडित आहे. त्याचे वडिल लहानू इंगळे हे प्रसिद्ध वाजंत्री पथकाचे संचालक असून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करतात. अभिषेक शुक्रवारी रात्री मुंबईवरून नागपूरकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये बसला. त्याच्यासोबत आणखी एक महिला होती. ते एस ५ कोचमधून प्रवास करीत होते. रात्री त्याने आपले महत्त्वाचे साहित्य लेडीज पर्समध्ये ठेवले. रात्रीची वेळ असल्यामुळे सर्व प्रवासी झोपेत होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून नेली. भुसावळ रेल्वेस्थानक येण्यापूर्वी झोपेतून जागे झाल्यानंतर अभिषेकने पर्स पाहिली असता ती आढळली नाही. पर्सचा शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाही. पर्समध्ये ८२ हजार रुपये किमतीचा आयफोन, दुसरा एक मोबाईल, महत्त्वाचे कागदपत्र आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल होता. नागपूरात गाडी येताच अभिषेकने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.