पैशांसाठी दुचाकी, रिक्षाची चोरी; आरोपी गजाआड, चार गुन्हे उघडकीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 01:37 PM2022-01-07T13:37:59+5:302022-01-07T14:25:58+5:30
Crime News : आरोपीने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आणि टिटवाळा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 असे 4 वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत.
डोंबिवली: एकिकडे वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत असताना दुचाकी आणि रिक्षा चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला रामनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. रोशन रामदास म्हात्रे असे चोरट्याचे नाव असून त्याच्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
कल्याण डोंबिवली शहरात घडणाऱ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमधील चोरट्यांना अटक केली जात असलीतरी वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता रामनगर हद्दीत पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालण्याकामी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा रोडवरील लोढा हेरीटेज परिसरातील वास्तुविहार सोसायटीत राहणाऱ्या चंद्रेश मुंवरकर यांची दुचाकी फडके रोड परिसरातून चोरीला गेल्याची घटना 11 मे 2021 रोजी घडली होती. त्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान पोलीस उपनिरिक्षक संदीप शिंगटे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, पोलिस नाईक प्रशांत सरनाईक, पोलिस शिपाई जयपाल मोरे, वैजनाथ रावखंडे असे पथक मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास गस्त घालीत असताना पोलीस हवालदार वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुचाकी आणि रिक्षा चोरी करणारा चोरटा हा डोंबिवली पुर्वेतील नांदिवली नाला, सुनीलनगर याठिकाणी येणार आहे.
त्यानुसार पथकाने सापळा लावून संबंधित चोरटा रोशन रामदास म्हात्रे याला अटक केली. रोशन हा काहीही कामधंदा करीत नाही. पैशांसाठी तो रिक्षा आणि दुचाकी चोरायचा असे तपासात समोर आले आहे. त्याने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आणि टिटवाळा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 असे 4 वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक सांडभोर यांनी दिली.