२० वर्षांनंतर चोरीचा ऐवज मिळाला परत; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:48 AM2020-08-29T00:48:08+5:302020-08-29T00:48:13+5:30
प्रवाशांना दिलासा
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २० वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे. यासह बदललेला पत्ता शोधून अन्य दोघा तक्रारदारांनाही १० व १२ वर्षांनंतर ऐवज परत केला आहे.
सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत केलेला ऐवज मूळ मालकांना देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ऐवज प्रदान करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. इतक्या वर्षांनंतर आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने तक्रारदारांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.
ठाण्यातील रुणवालनगर येथे राहणाऱ्या प्रिया तुपे यांची आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी २००० साली ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. तसेच फिर्यादी प्रिया यांचा शोध घेऊन व न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांना सोनसाखळी परत केली. वीस वर्षांपूर्वी चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने महेश तुपे यांनी पोलिसांचे आभार मानले. दुसºया घटनेत पुण्यातील अमृतसिंह राजवतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी २०११ साली चोरीस गेली होती. या गुन्ह्याचाही छडा लावला. तक्रारदार यांचा पत्ता बदलल्याने ऐवज परत करणे शक्य होत नव्हते. पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे वर्षभर शोध घेतला. अखेरीस गरेवाल पुण्यात असल्याचे कळल्याने पोलिसांनी १० वर्षांनंतर त्यांचा ऐवज सुखरूप परत केला. ं
तिसºया घटनेत आझादनगर येथील प्रवासी अमित कार्ले यांच्या ३२ ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळ्या २००८ रोजी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचाही तपास करून लोहमार्ग पोलिसांनी १२ वर्षांनंतर कार्ले यांचा बदललेला पत्ता शोधून ऐवज परत केला. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्याच्या उपक्रमांतर्गत लॉकडाऊनच्या काळातही पोलिसांनी ऐवज परत केल्याने प्रवाशांनी आभार मानले.