...तर तुमच्याही नावाचे टॅटू काढेन; वाघमारे पोलिसांना द्यायचा धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:50 AM2024-07-27T07:50:28+5:302024-07-27T07:50:54+5:30
विलेपार्लेचा रहिवासी असलेल्या वाघमारे विरुद्ध डझनभर गुन्ह्यांची नोंददेखील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्पा मालकांनीच सुपारी देत काटा काढलेल्या गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे ऊर्फ चुलबुल पांडे (५०) हा गजनी चित्रपटाप्रमाणे दुश्मनांची, विरोधकांची नावे अंगावर गोंदवत होता. मांडीवरच्या नावाप्रमाणे पाठीवर देखील शेकडो जणांची नावे त्याने गोंदल्याचे समोर आले होते. त्याच्यावर कारवाईसाठी येणाऱ्या पोलिसांनाही घाबरविण्यासाठी टॅटूची धमकी देत असल्याचे समोर आले आहे.
विलेपार्लेचा रहिवासी असलेल्या वाघमारे विरुद्ध डझनभर गुन्ह्यांची नोंददेखील आहे. त्याच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले वरळीतील सॉफ्ट टच स्पाचे मालक संतोष शेरेकर, फिरोज अन्सारी यांच्यासह २२ जणांची नावे आहेत. वाघमारेला २०१६ मध्ये मुलुंड पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली, तेव्हा, त्याच्या पाठीवर शेकडो जणांची नावे गोंदलेली दिसून आली. यामध्ये स्पा मालकासह, पोलिस, पत्रकार यांच्यासह स्वतःच्या कुटुंबांच्या नावाचा समावेश आहे. जिथे कुणाशी वाद व्हायचा, तो त्याचे नाव थेट शरीरावर गोंदवून ठेवायचा. भविष्यात काही झाल्यास याच व्यक्तींना मृत्यूस जबाबदार धरावे, म्हणून तो त्यांची नावे गोंदवत होता, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. फिरोज आणि साकिबला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
म्हणून हत्येसाठी कैचीचा वापर...
कैचीने फाडले तर टाके करता येत नाही म्हणून हत्येसाठी कैचीचा वापर केल्याचे साकीबच्या चौकशीत समोर आले. त्याने सात हजार रुपयांत ही कैची खरेदी केली होती. साकीब हा अभिलेखावरील आरोपी असून यापूर्वीच्या गुन्ह्यातदेखील त्याने अशाच प्रकारे कैचीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्पा मालक शेरेकर याच्या विरुद्धही पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे.
एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, वाघमारे हा स्पा चालकांकडून पैसे घेत त्यांना स्पा पुन्हा सुरू करायला मदत करायचा. पुढे येथील महिलांचाही वापर करून घेत होता. काही दिवसाने पुन्हा त्या स्पा विरोधात तक्रारी करून स्पाचालकाला अडचणीत आणायचा. याबाबत स्थानिक पातळीवर कोणी दखल घेतली नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करायचा. अशाच प्रकारे त्याने मुंबई, ठाण्यासह विविध स्पा मालकांना वेठीस धरले होते.
चार महिन्यात पाच वेळा हत्येचा प्रयत्न
n वरळीतील गुरू वाघमारेच्या त्रासाला कंटाळून वरळीतील स्पा मालक संतोष शेरेकरने एका मारेकऱ्याला १२ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. यातील दोन लाख रुपये मारेकऱ्याला ॲडव्हान्स देण्यात आले होते. तसेच चार महिन्यात वाघमारेची पाच वेळा हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही आता पोलिस तपासात उघड झाली आहे. मात्र हे पाच प्रयत्न फसल्यानंतर फिरोज अन्सारीच्या मदतीने वाघमारेचा काटा काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
n मारेकरी फिरोज अन्सारी महिनाभरापासून वाघमारेच्या मागावर होता. त्याला शेरेकरने सहा लाखांची सुपारी दिली होती. त्याचा साथीदार साकीब अन्सारी दहा दिवसांपूर्वीच फिरोजकडे नालासोपारा येथे राहण्यास आला होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासूनच ते वाघमारेचा पाठलाग करत होते. सकाळी विलेपार्ले परिसरात फिरल्यानंतर वाघमारे दुपारी जेऊन कांदिवलीत आला. तेथून तो पुन्हा घरी आला.
n विलेपार्लेतून सायंकाळी सायन परिसरात आल्यानंतर त्याची मैत्रीण आणि स्पाचे अन्य सहकारी त्याला भेटले. पार्टी करून ते स्पामध्ये परतले. यादरम्यान त्याच्या मागावर असलेले अन्सारी, साकिब याच्यासह आणखीन दोघेजण तेथे पोचले, आणि त्यांनी वाघमारेची हत्या केली.