...तेव्हाच होईल रियाला अटक! पाटणा पोलिसांकडून सध्या केवळ चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:11 AM2020-07-31T06:11:02+5:302020-07-31T06:11:26+5:30
सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबाविरोधात पाटणा पोलिसात दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. मात्र सध्या पाटणा पोलीस तिची केवळ चौकशी करणार असून आरोप सिद्ध झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे. पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियावर दखलपात्र गुन्हा दाखल करणारे सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातील तथ्य तपासून पाहण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र रिया यासाठी सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. रिया निर्दोष असेल तर तिने तिची बाजू मांडणे गरजेचे आहे.
दरम्यान, रिया आणि एफआयआरमध्ये नावे दाखल झालेल्या सर्वांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाईल. पाटणा पोलिसांनी आतापर्यंत तिघांचा जबाब नोंदविला असून त्यात सुुशांतची बहीण मितू, सुशांतचा वर्सोव्यात राहणारा नोकर आणि एका चार्टर्ड अकाउंटंटचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोटक महिंद्रा बँकेतील खात्याची चौकशी
सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. हे पैसे कोणत्या खात्यात पाठविण्यात आले? सुशांत यासाठी बँकेत आला होता का? याची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सुशांतची बहीण मितूला सोबत घेऊन पाटणा पोलीस ही चौकशी करत आहेत.
मेंदूवर नियंत्रण कसे मिळवले?
सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे रियाने त्याच्या मेंदूवर नियंत्रण कसे मिळवले, नेमके काय केले की ज्यामुळे त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले याचा खुलासा होणे अधिक गरजेचे आहे.
- विकास सिंग,
सुशांतच्या वडिलांचे वकील
रियाच्या सांगण्यावरून दिली औषधे?
एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये सुशांतचा गेल्या पाच वर्षांपासूनचा जीम ट्रेनर तसेच जवळचा मित्र सामी अहमद याने खळबळजनक खुलासा केला आहे. रियाच्या सांगण्यावरून सुशांतला डिप्रेशनची औषधे दिली जात होती, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा अद्याप पोलिसांनी दिलेला नाही.
अंकिता लोखंडेचा जबाब नोंदविला - संजय सिंग
च्सुशांतच्या मृत्युप्रकरणी त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिचा जबाब गुरुवारी पाटणा पोलिसांनी नोंदविला. जवळपास तासभर हे पथक तिच्या घरी होते.
च्अंकितानेच सुशांत मृत्यूप्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीचा पदार्फाश करत अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्याच्या कुटुंबाला दिल्याचे समजते. त्यानंतर पाटणा पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
च्पाटण्याचे डीआयजी संजय सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. हा जबाब या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.