वेबसाइटवर मालीश करणारा शोधत होता; त्याच्याच पत्नी अन् बहिणीचे फोटो दिसले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:55 PM2022-12-13T13:55:00+5:302022-12-13T13:56:02+5:30
तक्रारदाराने वेबसाइटवरील फोटोंवर क्लिक केले आणि त्याला एक मोबाइल क्रमांक प्राप्त झाला.
मुंबई : सोशल मीडियावर पोस्ट केलेले सुंदर महिलांचे फोटो चोरून ते डेटिंगच्या पॉर्न साइटवर टाकण्याचा प्रकार वाढत चालला आहे. नुसतेच खार पोलिसांनी रेश्मा यादव नामक एका महिलेला अशाच प्रकरणात अटक केली असून, ती या टोळीचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनुसार, तक्रारदार हे ३१ वर्षीय इसम असून, ते खार येथील रहिवासी आहेत. एक एस्कॉर्ट/डेटिंग वेबसाइटवर ते मालीश करणारा शोधत असताना त्यावर त्यांना त्यांची पत्नी आणि बहिणीचा फोटो दिसला. तेव्हा तक्रारदाराने त्या दोघींनाही याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही छायाचित्रे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ५ वर्षांपूर्वी अपलोड केलेली आहेत. तेव्हा तक्रारदाराने वेबसाइटवरील फोटोंवर क्लिक केले आणि त्याला एक मोबाइल क्रमांक प्राप्त झाला. त्या नंबरवर कॉल करून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवल्यावर एका महिलेने रिप्लाय केला. तक्रारदाराने महिलेला खार पश्चिम येथील हॉटेलजवळ भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि बहिणीही उपस्थित होत्या.
महिलेने तक्रारदाराची भेट घेतली तेव्हा त्याने महिलांच्या फोटोंबाबत जाब विचारला. तेव्हा ती त्यांच्याशी भांडू लागली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, तक्रारदार यांची पत्नी आणि बहिणीने तिला पकडले आणि ते तिला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. आम्ही या प्रकरणी गुन्हा नोंदवत रेश्मा यादव नावाच्या महिलेला अटक केली. तिच्यावर भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
'हे' मोठे रॅकेट-
१. महिलेची कार्यपद्धती पाहता असे दिसते की, हे एक मोठे रॅकेट आहे. जिथे कदाचित एखाद्या टोळीतील लोक त्यांच्या सोशल मीडिया पृष्ठांवरून घेतलेले सुंदर महिलांचे फोटो अपलोड करून लोकांना त्यांच्या वेबसाइटवर आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
२. यादवने दावा केला की तिने ते फोटो अपलोड केले नाहीत. फोटो अपलोड केल्यास प्रोफाइल लॉक केले पाहिजे, जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.