भ्रष्टाचार प्रकरणातून वाझेची सुटका नाहीच; विशेष न्यायालयाने फेटाळला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 06:07 AM2023-04-06T06:07:37+5:302023-04-06T06:08:01+5:30
अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाझे ‘माफीचा साक्षीदार’ झाला, मात्र...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातून औपचारिक सुटका करण्याचा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेचा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी फेटाळला. या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने त्याने आपल्यावरील आरोप वगळण्यात यावे व प्रकरणातून सुटका करण्याची विनंती वाझेने अर्जाद्वारे न्यायालयाला केली होती.
अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाझे ‘माफीचा साक्षीदार’ झाला. मात्र, तो अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे तर देशमुख व अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ‘अन्य आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. मात्र, मी अजूनही कोठडीत आहे. सीबीआयने खटला मजबूत करण्यासाठी मला माफीचा साक्षीदार केले. परंतु, वागणूक आरोपीप्रमाणे मिळत आहे,’ असे वाझेने अर्जात म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली रुपयांचा आरोप केला. देशमुखांनी मुंबईच्या बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट मुंबई पोलिसांना दिल्याचा आरोप सिंग यांनी केला. त्याआधारे सीबीआयने देशमुख यांच्यासह वाझे व अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला.
सीबीआयचा युक्तिवाद काय?
वाझेला न्यायालयात आरोपी म्हणून हजर करण्यात आले होते. न्यायालयात हजर केलेला आरोपी हा न्यायालयाने त्याला निर्दोष सोडेपर्यंत किंवा आरोपमुक्त करेपर्यंत आरोपीच राहतो. सीआरपीसीअंतर्गत न्यायालयाला आरोपीला माफीचा साक्षीदार करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ आरोपीला आरोपमुक्त करावे असा होत नाही, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला.