विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 01:15 AM2019-09-08T01:15:07+5:302019-09-08T01:15:12+5:30
तब्बल तीन गुन्हे दाखल । दिंंडोशी पोलिसांची टाळाटाळ
मुंबई : शेजारी राहणाºया महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न, मारहाण आणि शिवीगाळ करण्याबाबत तीन गुन्हे आणि तब्बल ३४ अदखलपात्र तक्रारी दाखल असतानाही दिंडोशी पोलीस आरोपींविरूद्ध कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत संबंधित पिडीत महिलेने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
मालाड (पुर्व) येथील कासमबाग परिसरात राहाणाºया मलेकर कुटुंबीय गेली पाच वर्षे आपण आपले घर त्यांना विकावे यासाठी आपला मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याची सेल्वी पाकिनाथन हिची तक्रार आहे. २ आॅक्टोबर २0१८ रोजी आरोपी रंजना मलेकर, संगीता मिरजोळकर आणि प्रियंका मिरजोळकर यांनी आपणास बेदम मारहाण करून आपल्या तसेच आपल्या मुलाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सेल्वी पाकीनाथन हिने केल्याने तिघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१ मे २0१९ रोजी संगीता मिरजोळकर हिने श्वेता पाकीनाथन हिने आपण पोलिसात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी तिच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याबाबत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १७ जूनला संगीता आणि प्रियंका मिरजोळकर यांनी श्वेता पाकीनाथनचा लहान मुलगा दुकानात जात असताना पाठलाग करून त्याला सळईने मारहाण केली. त्यात त्याचा हाताला फ्रॅक्चर झाले. त्याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही आपणास इतके गुन्हे आणि तक्रारी दाखल असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी सेल्वी पाकीनाथन हिची मागणी आहे. याबाबत खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार हुसेन दलवाई यांनीही वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
२३ आॅगस्टला सेल्वी पाकीनादन पतीसह सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात दाद मागण्यासाठी गेली होती. तेथून आपल्या घरी परतल्यावर रवींद्र मलेकर याचा त्याच विभागातील मित्र प्रसाद नेमण याने आपल्याला बांबूने बेदम मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार तिने दिंडोशी पोलीस ठाण्यात केली. आपल्या मित्राविरूद्ध तक्रार करीत असल्याच्या रागाने त्याने मारहाण केली. त्यानुसार आरोपी नेमणविरूद्ध मारहाण, धमकी देण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
संबंधित आरोपींविरूद्धचा एक गुन्हा सोडला तर अन्य सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.- सुनील शिंदे,पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस ठाणे