Fact Check : नशिबी संघर्ष आला, पण खलबत्ते नाही विकावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 11:30 PM2020-10-23T23:30:00+5:302020-10-23T23:30:00+5:30
Lady Police Officer Pdmasheela Tirpude: माझा भुतकाळ आणि संघर्ष चुकीच्या पध्दतीने मांडला जातोय
भंडारा : सध्या एक पोस्ट सोशल मिडीयावर वेगाने वायरल होत आहे. डोक्यावर खलबत्ते आणि कडेवर चिमुकले बाळ घेतलेली महिला संघर्ष करुन पोलीस उपनिरीक्षक झाली, असे सांगणारी. मात्र ती पोलीस उपनिरीक्षक झाली, तीने संघर्षही केला परंतु खलबत्ते कधीच विकावे लागले नाही, असे खुद्द ती पोलीस उपनिरीक्षकच सांगते. माझा भुतकाळ आणि संघर्ष चुकीच्या पध्दतीने मांडला जातो. त्याला आपणतरी काय करावे, असा उद्वीग्न प्रश्न ती करते.
पद्मशीला तिरपुडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्या सध्या नागपूर जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सोशल मिडीयावर त्यांच्याबाबत होत असलेल्या वायरल पोस्टबाबत ह्यलोकमतह्णने संपर्क साधला तेव्हा सुरुवातीला त्या काहीश्या उद्वीग्न झाल्या. दर सहा सात महिन्यांनी ही पोस्ट कुठुतरी वायरल होते आणि त्याचा मनस्ताप आपल्याला सहन करावा लागतो, असे त्या म्हणाल्या. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ माझे माहेर तर वाकेश्वर सासर. आमचा प्रेम विवाह झाला. परिस्थिती हलाखीची होती. कामाच्या शोधात आम्ही नाशिकला गेलो. मिळेल ते काम करु लागलो. मात्र शिकण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्यातूनच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०१२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण केली. २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून पासआऊट झाले.
त्यावेळी आम्ही कुटुंबियासोबत एक फोटो काढला होता. तोच फोटो आता खलबत्ते विकणाऱ्या महिलेसोबत जोडून माझा संघर्ष मांडला जातो. ती महिला माझ्यासारखी दिसते हा योगायोग आहे. परंतु खलबत्ते विकणारी मी नव्हेच. असे स्पष्ट पद्मशीला तिरपुडे यांनी सांगितले. समाजमाध्यमावर वारंवार होणाऱ्या या पोस्टमुळे सुरुवातीला प्रचंड त्रास व्हायचा. फोनवर विचारणा व्हायची. प्रत्येकाला उत्तर देतादेता दमछाक व्यायची. परंतु आता त्याचे काही वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.
ती खलबत्ते विकणारी महिला कोण?
साधारणत: नवरात्रोत्सवाच्या काळात ही पोस्ट वायरल होते. त्याला भरभरुन दादही मिळते. संघर्षाची कहाणी त्यात असली तरी ती माहिती अत्यंत चुकीची आहे. मात्र आता प्रश्न उरतो पद्मशीला तिरपुडे म्हणून खलबत्ते विकणारा महिलेचा फोटो जोडला जातो ती महिला कोण आहे. हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिचा वाट्याला आजही संघर्षच आहे काय? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.
संघर्ष करुन मी पोलीस उपनिरीक्षक झाले. परंतु कुणीतरी परस्पर माझा फोटो त्या खलबत्ते विकणाऱ्या महिलेसोबत जोडला. खातरजमा करण्याची कुणी तसदी घेतली नाही. पोस्ट तयार करणाऱ्याचा उद्देश चांगला असला तरी अशी चुकीची माहिती प्रसारीत होत असल्याने मला मात्र प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता तर आपण अशा पोस्टकडे लक्षही देणे सोडले आहे.- पद्मशीला तिरपुडे, सहायक पोलीस निरीक्षक