हे आहेत लाचखोरीचे ‘हायफाय फंडे’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:33 AM2023-02-26T07:33:24+5:302023-02-26T07:33:48+5:30
ऑनलाइन लाचखोरीचा एक नवा ट्रेंड मुंबई विमानतळावर उजेडात आला. परदेशातून आलेल्या एखाद्या प्रवाशाला कस्टमचे अधिकारी घेरतात आणि त्यानंतर त्याच्याकडील सामानावर दंड लागेल किंवा अटक होईल, अशी धमकी त्याला देतात.
- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
फिकचा एखादा नियम मोडला आणि हवालदाराने पडकले की, चिरीमिरी देऊन सुटायचे, हे काही नवीन काही. त्यातही रस्त्यावर आता सीसीटीव्ही लागल्यामुळे हवालदार थेट स्वतःच्या हातामध्ये चिरीमिरी न घेता जवळच्या एखाद्या पान टपरीवाल्याकडे किंवा चहाच्या टपरीवर ते पैसे द्यायला सांगत प्रवाशाला सोडतात. अर्थात, हे झाले नित्याचे फंडे; पण भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी यंत्रणा आता अधिक सतर्क होत असल्यामुळे ज्यांना लाचखोरी करायची आहे, त्यांनी आता अधिक मेंदू चालवत नवनवीन फंडे शोधून काढले आहेत. त्यात त्यांना साथ मिळतेय ती तंत्रज्ञानाच्या नवनव्या आविष्कारांची.
...तर जुन्या तारखेची वर्क ऑर्डर मिळेल !
जेव्हा एखाद्या कामाचे कंत्राट/निविदा निघते त्यामध्ये जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर मुदतीनंतरच्या प्रत्येक दिवसाकरिता दंडाची आकारणी करण्यात येते. कंत्राटाच्या व्यवहारामध्ये कंत्राटाची एकूण रक्कम आणि त्यावर अधिकाऱ्यांची टक्केवारी हा अलिखित फॉर्म्युला आहे; पण अनेकवेळा प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे कामाचा कालावधी वाढतो आणि मग कंत्राटदाराला दंडही भरावा लागतो. यावर एका अधिकाऱ्याने तोडगा काढला की, पहिले आमची टक्केवारी द्या मग तुम्हाला मी जुन्या तारखेची वर्क ऑर्डर देतो. यामुळे मग प्रकल्पपूर्तीसाठी तुम्हाला वाढीव वेळ मिळेल.
कॅल्क्युलेटरवर लाचेची आकडेमोड
लाचेसंदर्भात व्यवहार करताना शक्यतो आकडा बोलायचा नाही, असे शिक्षण जीसएटी विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एका व्यापाऱ्याला नुकतेच दिले. त्याऐवजी मुख्य मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर त्याने त्याच्या मनात पैशांचा आकडा पुढ्यात असलेल्या कॅल्क्युलेटरवर लिहिला. मग त्या व्यापाऱ्याला तो व्यवहार मान्य नसल्याने त्याने तो आकडा खोडत तो काय देऊ शकतो, त्याचा आकडा कॅल्क्युलेटरवर लिहिला. वाटाघाटीनंतर एक कोटी रुपयांचा आकडा अशा पद्धतीने ठरला.
रेडिओच्या आवाजावर ठरली लाचेची रक्कम
nपोलिस यंत्रणा लाचखोरीच्या बाबतीत कशा काम करतात, याची खडान् खडा माहिती असल्यामुळे अलीकडेच दिल्लीतील एका उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने एका व्यक्तीला स्वतःच्या खासगी गाडीत बसवले आणि त्याचे प्रकरण ज्या गोष्टीशी संबंधित होते, त्यावर चर्चा सुरू केली.
nजेव्हा विषय देवाण-घेवाणीचा आला तेव्हा स्टेअरिंग व्हिलवर बसलेल्या या अधिकाऱ्याने सोबतच्या त्या व्यक्तीला तोंडावर बोट ठेवून काहीही न बोलण्याची सूचना केली. त्यानंतर समोर असलेल्या रेडिओचा आवाज २० पर्यंत वाढवला. याचा अर्थ त्याला त्या व्यक्तीच्या प्रकरणात २० लाख रुपये हवे होते. मग त्या व्यक्तीने आवाजाची मर्यादा १५ पर्यंत खाली केली.
nएवढ्या कमी आवाजात आपल्याला ऐकायला येत नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मग वाटाघाटीनंतर रेडिओच्या आवाजाचा आकडा १८ वर स्थिरावला.
ऑनलाइन लाचखोरी...
ऑनलाइन लाचखोरीचा एक नवा ट्रेंड मुंबई विमानतळावर उजेडात आला. परदेशातून आलेल्या एखाद्या प्रवाशाला कस्टमचे अधिकारी घेरतात आणि त्यानंतर त्याच्याकडील सामानावर दंड लागेल किंवा अटक होईल, अशी धमकी त्याला देतात.
प्रवासातून थकून आलेला आणि अधिकाऱ्यांच्या घेरावात घाबरलेला प्रवासी मग ते अधिकारी सांगत ते करायला तयार होतो. या प्रवाशाकडून थेट पैसे स्वीकारण्याऐवजी हे अधिकारी त्या प्रवाशाला एक किंवा दोन मोबाइल नंबर देत आणि त्या नंबरवर जी-पेच्या माध्यमातून लाचेची रक्कम पाठवायला सांगत.
स्वतः यामध्ये अडकू नये म्हणून ज्यांचे मोबाइल नंबर देण्यात आले ते विमानतळावर लोडर म्हणून काम करणारे लोक होते. या लोडरच्या अकाऊंटवर पैसे जमा झाले की, तो त्याचे कमिशन कापून उर्वरित रक्कम एटीएममधून काढून अधिकाऱ्यांना देत असे. गेल्या वर्षभरात मुंबई विमानतळावर जी-पेच्या माध्यमातून तब्बल ४७ लाख रुपयांची लाचखोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
पार्टी, गिफ्ट हे अगदीच नित्याचे...
एखाद्या अधिकाऱ्याला मित्र अथवा कुटुंबासोबत जायचे असेल तर त्याच्यासाठी हॉटेलमध्ये बुकिंग करणे किंवा त्याला हवे ते गिफ्ट देणे हे आता अगदीच नित्याचे झाले आहे. अशावेळी हातामध्ये प्रत्यक्ष पैसे पडत नसले तरी तो देखील लाचखोरीचाच मार्ग समजला जातो.