पोलीस असल्याचे सांगून वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या
By दत्ता यादव | Published: May 18, 2023 04:35 PM2023-05-18T16:35:59+5:302023-05-18T16:36:09+5:30
पिशवीमध्ये बांगड्या ठेवण्याचे नाटक करत चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या हातचलाखी करून लांबविल्या.
सातारा : येथील पोवई नाक्यावर भर वर्दळीच्या ठिकाणी पोलिस असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या हातोहात लांबविल्या. ही घटना मंगळवार, दि. १६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयश्री विनायक देशपांडे (वय ७३, रा. चैत्यन्य हाउसिंग काॅलनी, शाहूनगर, सातारा) या मंगळवारी सायंकाळी पोवई नाक्यावरील एका दवाखान्यात आल्या होत्या. त्यावेळी तेथे दोन युवक आले. ‘आम्ही पोलिस आहोत, तुम्ही सोन्याच्या बांगड्या कशासाठी घातल्या आहेत. चोऱ्या होत आहेत. त्या काढून द्या, तुमच्या पिशवीत ठेवतो,’ असे म्हणून त्यांच्याकडून बांगड्या काढून घेतल्या.
पिशवीमध्ये बांगड्या ठेवण्याचे नाटक करत चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या हातचलाखी करून लांबविल्या. काही वेळानंतर देशपांडे यांना आपल्या पिशवीमध्ये बांगड्या नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर हा प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी देशपांडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातारा शहरात अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. मात्र, तोतया पोलिस अद्यापही खऱ्या पोलिसांना सापडले नाहीत. याबाबत अधिक तपास हवालदार दळवी हे करीत आहेत.