आधी उडवाउडवी, खाक्या दाखवताच सहा दुचाकी चोरीची कबुली; सराईत चोराला अटक
By प्रदीप भाकरे | Published: October 9, 2023 08:33 PM2023-10-09T20:33:07+5:302023-10-09T20:33:16+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई, खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा उलगडा
प्रदीप भाकरे, अमरावती: एका सराईत दुचाकी चोराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ९ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सय्यद राशीद सय्यद नूर (२३, रा. पठाण चौक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी (क्र. एमएच २७ डीजे ७१६५) चोरीला गेली होती. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट दोनदेखील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासात एक चोर चोरीच्या दुचाकीवरून लालखडी परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव सय्यद राशीद सय्यद नूर असे सांगितले. दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीदरम्यान ती दुचाकी खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेल्याचे समोर आल्यावर सय्यद राशीदची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली.
सहा गुन्ह्यांचा उलगडा
खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात नोंद वाहन चोरीसह आणखी पाच दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, संदीप खंडारे यांनी केली.