सूटबूट घालून उंची कारमध्ये फिरुन घरफोडी करणारे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 08:22 PM2019-03-26T20:22:22+5:302019-03-26T20:26:49+5:30
सूटबूट घालून महागड्या कारमध्ये फिरुन घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या दोघांना जेरबंद केले
विमाननगर : सूटबूट घालून महागड्या कारमध्ये फिरुन घरफोडी व चोऱ्यां करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनीअटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दिली. जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२,रा.औंधरोड पुणे) व नितिन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय२५,रा.मुंढवा पुणे) या दोघा सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून येरवडा पोलिस स्टेशनकडील १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील १८ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघाहि आरोपींना २एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जयवंत गायकवाड व नितिन जाधव हे येरवड्यात येणार असल्याची खात्रीशीर बातमी येरवडा पोलिसांना मिळाली होती.
त्यांना तात्काळ सापळा रचून येरवडा तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुद्देमालासह जेरबंद केले.जयवंत जाधव याच्यावर पुणे शहर व परिसरातील तब्बल ८८ तर नितिन जाधव वर घरफोडी व चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. येरवडा पोलिस स्टेशनकडील घरफोडीच्या तब्बल १५ गुन्ह्यांची या दोघांनी कबूली दिली. त्यांच्याकडून या गंभीर गुन्ह्यातील रोख रक्कम ९७ हजारासह साडे आठ तोळे सोन्याचे तर दोन तोळे चांदिचे दागिने, सोनी कंपनीचा एलसीडी टिव्ही व एक शेरओलेट कँप्टिव्हा कार असा सुमारे १८लाख ४५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे दोघेहि आरोपी पुणे शहर व परिसरात कँमेरा नसणाऱ्या ठिकाणी कार पार्क करुन सुट बूट घालून घरफोडीचे गुन्हे करत होते.पेहराव बदलून चोरीच्या महागड्या गाडीत फिरुन कोणताही पुरावा मिळू नये यासाठी सीसीटिव्ही नसणाऱ्या ठिकाणी गाडी पार्क करुन सराईतपणे गुन्हे करत होते.
पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी,पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु,येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार,पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम,गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे प्रमुख मंगेश भांगे,पोलिस कर्मचारी अशोक गवळी ,नवनाथ मोहिते,मनोज कुदळे,पंकज मुसळे, हणमंत जाधव,समिर भोरडे,अजय पडोळे,बाळू बहिरट यांच्या पथकाने या सराईत आरोपींना जेरबंद केले.