'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 12:37 PM2021-01-10T12:37:37+5:302021-01-10T12:37:47+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत.
यवतमाळ: कोरोना वार्ड म्हटलं की कोणी त्या बाजूने फिरकण्याची हिम्मत करत नाही. अनेकदा रुग्णाचेही नातेवाईकान या परिसरात साधी विचारपूस करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. असा कडेकोट बंदोबस्त असताना यवतमाळच्या मेडिकल मध्ये असलेल्या कोरोना रुग्णालयात चक्क चोर शिरला, त्याने एक नव्हे तर तीन मोबाईल लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी चार वाजता उघड झाली.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत. येथील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये चक्क चोर शिरला. चोरट्याने रुग्णाचे तीन मोबाईल लंपास केले. चोरी तक्रार करताच या रुग्णांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला.
स्वतःचे साहित्य स्वतःच सांभाळावे असे तेथील उपस्थित कर्मचाऱ्याने सुनावले. या उत्तराने रुग्ण संतापले, इतकी सुरक्षा असताना बाहेरची व्यक्ती आत येऊ शकत नाही. या चोरी मागे येथीलच कोणी तरी यात असावा, असा संशय रुगांनी व्यक्त केला. या घटनेची पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.
पीपीई किट घालून चोरी-
कोरोना वार्डमधून रुग्णाचे मोबाईल चोरी करण्यासाठी चोराने पीपीई किट घातलं होतं. त्यामुळे कुणालाच संशय आला नाही. आता कोरोना वॉर्डही चोरापासून सुरक्षित नाही, अशी प्रतिक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णाने 'लोकमत'ला दिली