बनावट ग्राहक बनून महागडे आयफोन्स चोरणारा शेवटी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 06:20 PM2020-07-07T18:20:57+5:302020-07-07T18:25:27+5:30
सापळा रचून पोलिसांनी केली अटक: 1.90 लाखांचे दोन फोन जप्त
मडगाव: ई कॉमर्स वेबसाईटवरन महागडे आय फोन्स विकणाऱ्यांना हेरून त्यांना आपण ग्राहक असल्याचे भासवून लोकांचे फोन्स चोरणाऱ्या एका 18 वर्षीय संशयिताला पोलिसांनी त्याच्याच मार्गाने सापळा रचून शेवटी गजाआड केले. कोलवा व कुंकळी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी केली.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयिताल अटक करून त्याच्याकडून 1.90 लाखांचे आय फोन व एक दुचाकी जप्त केली आहे. या ठगाने आणखी कुणालाही अशाच प्रकारे लुटले आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
या प्रकाराची सविस्तर माहिती अशी की , संशयित वेबसाईटवरुन महागडे फोन विकण्याची जाहिरात दिलेल्याना हेरत असे. त्यांच्याशी नंतर संपर्क साधून त्यांना फोन विकण्यासाठी एका ठराविक जागेवर बोलवायचा. फोन तापसण्याच्या बहाण्याने तो फ़ोन आपल्याकडे घायचा आणि फोन हातात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या दुचाकीवरून पसार व्हायचा.
अशा रीतीने त्याने दोघांना गंडा घातल्याची तक्रार कोलवा आणि कुंकळी या पोलीस स्थानकावर आल्यानंतर या दोन्ही पोलीस स्थानकाच्या एलआयबी पथकाना कार्यरत करण्यात आले. या पथकाने एका बनावट इसमाच्या नावाने त्याच वेबसाईटवर आय फोन विकण्याची जाहिरात दिली. अशा रीतीने लोकांना गंडविण्याचे व्यसन लागलेल्या त्या संशयिताने या इसमाशीही संपर्क साधून त्याला एका ठराविक जागेवर बोलाविले. त्या इसमाबरोबर पोलिसही गेले होते याची त्याला सुतरामही शंका नव्हती. यावेळी पोलिसांबरोबर त्या गंडा पडलेल्या दोन व्यक्तीही होत्या. त्यांनी आरोपीला बरोबर ओळ्खल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या हा संशयित कोलवा पोलिसांचा पाहुणचार घेत असून लवकरच त्याला कुंकळी पोलिसही अटक करणार आहेत.