चोरी करून पळताना चोर पडला; दागिने, रोख विखुरली रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 08:58 AM2019-12-28T08:58:37+5:302019-12-28T08:59:04+5:30
एका चोराने त्याचाच मोबाईल चोरीच्या ठिकाणी विसरल्याने पकडला गेल्याचा प्रकार नुकताच घडला होता.
अमरावती : चोरी करताना चोरांनीच अनेक किस्से केल्याचे ऐकायला मिळते. चोर चोरी करण्यासाठी घरात शिरला आणि खाद्यपदार्थांवर ताव मारत तिथेच झोपी गेला. तर एका चोराने त्याचाच मोबाईल चोरीच्या ठिकाणी विसरल्याने पकडला गेल्याचा प्रकार नुकताच घडला होता. अमरावतीत आज रात्री असाच एक प्रकार घडला आहे.
शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास एका घरामध्ये चोर शिरला होता. मात्र, तेवढ्यातच तेथे घरमालक आल्याने चोराची तारांबळ उडाली आणि पकडले न जाण्यासाठी तो सैरावैरा पळू लागला. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावरच पडला. यामुळे त्याने चोरी केलेले दागिणे, रोख रक्कम रस्त्यावरच विखुरली गेली.
चोर असल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्याला लगेचच पकडले आणि बेदम चोप दिला. यामुळे हा चोर बेशुद्ध पडला. यानंतर या चोराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे बराच मुद्देमाल शर्ट, पँटच्या खिशात सापडला. देवरणकर नगरातील रहिवासी वकील हरिष तापडिया यांच्या घरासमोर हा प्रकार घडला.
या चोराची माहिती समजताच राजापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोराला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.