महावितरणच्या शाखा अभियंत्याचे घर फोडले, भर दुपारी दीड लाखाचे दागिने लंपास
By हणमंत पाटील | Published: July 19, 2024 11:40 PM2024-07-19T23:40:55+5:302024-07-19T23:41:09+5:30
भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विटा : महावितरणच्या नेवरी उपकेंद्रात कार्यरत असलेले शाखा अभियंता नितीन शेवाळकर यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख पाच हजार रुपयांसह ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विटा ते कराड रस्त्यावरील रेवा इमारतीत घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नितीन शेवाळकर हे महावितरणच्या नेवरी उपकेंद्रात शाखा अभियंता म्हणून काम पाहत असून ते विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या रेवा बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्नी राधिका व मुलीसह राहण्यास आहेत. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची पत्नी राधिका या त्यांच्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. त्या वेळी अज्ञात दोन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी चोरट्यांच्या हाताला कपाटातील रोख ५ हजार रुपये व १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लागले.
पत्नीला कोंडून चोरटे पसार...
दरम्यान, त्याच वेळी थोड्या वेळातच राधिका या घरी पोहोचल्या. त्यावेळी चोरटे घरातच होते. त्या ठिकाणी त्यांना दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी घरात जाऊन कोण आहे, अशी विचारणा केली. त्याच वेळी चोरट्यांनी त्यांना हुलकावणी देत बाहेर येत दरवाजा बंद करीत तेथून चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पहाणी केली. याप्रकरणी राधिका शेवाळकर यांनी रात्री उशिरा विटा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.