नागपुरात पुजाऱ्याच्या घरात चोरट्याने साधला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 08:48 PM2020-02-15T20:48:47+5:302020-02-15T20:49:55+5:30
ठिकठिकाणी पूजापाठ करणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे लकडगंज परिसरात एकच खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणी पूजापाठ करणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे लकडगंज परिसरात एकच खळबळ उडाली होती.
जिगनिश राजेश दवे (वय २६) असे फिर्यादीचे नाव आहे. ते लकडगंजच्या बाबुलवन पाण्याच्या टाकीजवळ राहतात. ते पूजापाठ करतात. नुकतेच त्यांच्या बहिणीचे लग्न झाले. त्यामुळे अनेकांचे देणे चुकविण्यासाठी त्यांनी आपल्या घरात बँकेतून रक्कम आणून ठेवली होती. शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांची आई आणि बहीण रुग्णालयात गेल्या. तर, ते सलूनमध्ये गेले होते. एक-दीड तासात ते परतले तेव्हा त्यांना त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्याने पार्किंगच्या दारावरून उडी मारून आत प्रवेश केला. घराच्या दाराचे कुलूप तोडले अन् शयनकक्षातील कपाटात ठेवलेले रोख २ लाख आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख, १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंजच्या एपीआय राखी गेडाम यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.