चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:25 PM2020-06-02T12:25:42+5:302020-06-02T12:27:25+5:30
कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले होते चोरुन; पोलिसांनी २४ तासाच्या आत केले़ जेरबंद..
पुणे : चंदननगरमध्ये घरफोडी करुन ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्याला पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले़. विशेष म्हणजे हा चोरटा त्याच सोसायटीतील निघाला. रोहन नितीन गद्रे (वय २२, रा़ गुरुछाया रेसिडेन्सी, साईनाथनगर, वडगावशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राजश्री गिते (वय ३०, रा. गरुछाया रेसिडेन्सी, साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गिते यांचा फ्लॅट गेले चार दिवस बंद होता.या काळात चोरट्याने बाथरुमच्या काचा काढून आत प्रवेश केला. कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. रविवारी सायंकाळी हाप्रकार उघडकीस आला होता.
चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकाऱ्यांनी लागलीच सोसायटीत भेट देऊन घराची पाहणी केली. त्यांनी आजू बाजूला चौकशी केली़ त्यावरुन ही चोरी घराची माहिती असणाऱ्यानेच केल्याचा पोलिसांना संशय आला. सोसायटीत बाहेरुन कोणी येऊन चोरी करुन शकत नसल्याचे घटनास्थळाची पाहणी करता पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरुन पोलिसांनी सोसायटीतील सर्वांकडे चौकशी सुरु केली.त्याचवेळी रोहन गद्रे हा तेथून निघून गेला. तेव्हा पोलिसांचा त्याच्यावरील संशय आणखी वाढला. पोलिसांनी त्याला शोधून काढले.त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्याकडून चोरीला गेलेले ४ लाख २७ हजार रुपयांचे १४२ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहे.
रोहन गद्रे हा याच सोसायटीत पूर्वी एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहून बांधकाम साईटवर काम करीत होता. लॉकडाऊन सुरु झाल्याने त्याचे काम बंदझाले. त्यामुळे त्याने सोसायटीतील फ्लॅट सोडला व तो रखवालदारासोबत राहूलागला होता. सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव अधिक तपास करीत आहेत.