चोरट्याचा तब्बल ३९ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; फ्लॅटची कडी-कोयंडा तोडून घरफोडी
By प्रशांत माने | Updated: April 30, 2023 15:43 IST2023-04-30T15:42:27+5:302023-04-30T15:43:44+5:30
या घरातील कुटुंब चार दिवस देवदर्शनासाठी बाहेर गेले असताना हा घरफोडीचा प्रकार घडला. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरट्याचा तब्बल ३९ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; फ्लॅटची कडी-कोयंडा तोडून घरफोडी
डोंबिवली: येथील पश्चिमेकडील कोपर-क्रॉस रोडवरील भाविक अपार्टमेंट मधील एका बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून घरातील तब्बल ३९ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घरातील कुटुंब चार दिवस देवदर्शनासाठी बाहेर गेले असताना हा घरफोडीचा प्रकार घडला. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
भाविक अपार्टमेंटमध्ये दुस-या मजल्यावर राहणारे श्रीनिवास कुरुपोली हे कुटुंबासोबत मंगळवारी सकाळी ११.३० वाजता वाराणसी उत्तर प्रदेश येथे देवदर्शनासाठी आणि गंगास्नानासाठी गेले होते. तेथून ते शुक्रवारी दुपारी घरी परतले. तेव्हा त्यांना घराला कुलूप असलेला कडी-कोयंडा कापलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात प्रवेश करताच त्यांना एकच धक्का बसला.
बेडरूमचे आणि आतील कपाटाचे लॉक तोडलेले आढळून आले. चोरीचा प्रकार समोर येताच त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. चोरट्याकडून कपाटामधील ३९ लाख २६ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच या गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह शहरातील अन्य पोलिस ठाणे तसेच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस समांतर तपास करीत आहेत.