धक्कादायक! आईच्या कुशीत झोपलेलं 8 महिन्यांचं बाळ चोरलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:54 PM2023-12-16T12:54:19+5:302023-12-16T13:07:03+5:30
मुलीच्या आईकडे राहण्यासाठी कोणतंही कायमस्वरुपी घर नाही. ती स्टेशनजवळ भीक मागून आपला उदरनिर्वाह करते.
झारखंडमधील जमशेदपूरच्या टाटानगर स्टेशनजवळ एका 8 महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मुलीचे पालक शुक्रवारी बागबेडा पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तक्रारीनंतर बागबेडा पोलिसांनी बाळ चोरणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईकडे राहण्यासाठी कोणतंही कायमस्वरुपी घर नाही. ती स्टेशनजवळ भीक मागून आपला उदरनिर्वाह करते आणि स्टेशनजवळ झोपते. गुरुवारी रात्री ती आपल्या 8 महिन्यांच्या मुलीसोबत झोपली होती. तिला जेव्हा जाग आली तेव्हा मुलगी बेपत्ता होती.
वर्षभरापूर्वीही चोरट्याने एका महिलेचं मूल चोरून रात्री पळ काढला होता, बराच शोध घेऊनही तो सापडला नव्हता. वर्षभरानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आम्ही रात्री इथे झोपलो होतो. अचानक पत्नीने बाळाला घेऊन जात असल्याचा आरडाओरडा सुरू केला. आम्हाला जाग आली तेव्हा एक माणूस गाडीकडे धावताना दिसला. एक कार होती, तो त्यात बसला आणि पळून गेला.
मुलीच्या आईने सांगितलं की, आम्ही मुलीसोबत झोपलो होतो. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आला आणि मुलीला उचलून पळून गेला. आम्ही उठून त्याचा पाठलाग केला, पण तो गाडीतून पळून गेला. आमची तक्रार रेल्वे पोलीस असो की जिल्हा पोलीस कुठलेही पोलीस घेत नव्हतं. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.