मौजमजेसाठी वाहन चोरी करणारे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात; १४ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:33 PM2020-07-23T17:33:10+5:302020-07-23T17:35:29+5:30
आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश
पिंपरी : मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पाच चारचाकी व नऊ दुचाकी वाहने जप्त केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चार व पाचच्या पथकाने ही कामगिरी केली.
आकाश उर्फ पप्या राजेंद्र सांडभोर (वय २५, रा. संग्रामनगर झोपडपटी, ओटास्किम, निगडी), सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड (वय २७, रा. संजयनगर, ओटास्किम, निगडी), अक्षय दशरथ शिंदे (वय २०, रा. अजंठानगर, निगडी) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी करणारे आरोपी सांडभोर व गायकवाड हे दोघे एका चोरीच्या दुचाकीवरून निगडी परिसरात संशयितरित्या फिरत आहेत, अशी माहिती युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार भक्तीशक्ती चौक परिसरात सापळा लावला. त्यावेळी आरोपी भक्ती शक्ती चौकाकडून पवळे उड्डाणपुलाकडे भरधाव जात होते. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकड चौकशी केली असता वाहन चोरीच्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. जूनमध्ये यमुनानगर येथील प्रेमअंकुर सोसायटी येथून चोरी केलेली दुचाकी त्यांच्याकडे मिळून आली.
वाहन चोरीतील मुख्य सुत्रधार बंड्या उर्फ पुरुषोत्तम विर (रा. नांदेड सिटी, सिंहगडरोड, पुणे) याच्या सोबत निगडी येथील यमुनानगर, पुणे येथील सनसिटी, तसेच दत्तवाडी, सिंहगडरोड - वडगाव फाटा रोड व ताथवडे येथील उद्यानाजवळून अशी पाच चारचाकी वाहने आरोपींनी चोरल्याचे कबूल केले. तसेच अरबाज हुसेन तलफदार (रा. ओटास्किम, निगडी) याने चार महिन्यांपूर्वी ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथून एक दुचाकी चोरली असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी
यांच्याकडून पाच चारचाकी व दोन दुचाकी अशी सात वाहने त्यांच्याकडून जप्त करून वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, युनिट दोनचे पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, दीपक खरात, वसंत खोमणे,उषा दळे, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस
आरोपी अक्षय शिंदे व अल्पवयीन आरोपी चोरीच्या दुचाकीवरून किवळे गावाकडे जाणार असल्याची माहिती युनिट पाचच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. मात्र त्याचा सुगावा लागल्याने आरोपी गाडी टाकून पळून जाऊ लागले. त्यांना शिताफिने पकडले. मौजमजा करण्यासाठी पिंपरी, वाकड, देहुरोड व कोथरुड परिसरातून दुचाकींची चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले.