बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या

By सोमनाथ खताळ | Published: July 29, 2023 09:50 PM2023-07-29T21:50:05+5:302023-07-29T21:54:34+5:30

रोख एक लाख रूपयेही हस्तगत

Thief who looted lakhs of rupees from a passenger from Beed bus station jailed | बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या

बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या

googlenewsNext

सोमनाथ खताळ, बीड: जालना जिल्ह्यातील एक प्रवासी बीड बसस्थानकातून बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या खिशातील रोख एक लाख रूपये लंपास झाले होते. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास लावत चोरट्याला बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्याकडून रोख एक लाख रूपयेही हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजता करण्यात आली.

सुभाष अर्जून गायकवाड (रा.शिरापूर जि.बीड ह.मु.बीड) असे चोरट्याचे नाव आहे. भास्कर नेमिनाथ जाधव (रा.अंबड जि.जालना) हे बीडमधील भाचे जावयाकडून एक लाख रूपये उसणे घेऊन अंबडला जात होते. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या डाव्या खिशात ठेवलेले रोख एक लाख रूपये घेऊन धुम ठोकली. बसमध्ये बसल्यावर जाधव यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच खाली उतरत इकडे तिकडे चोरट्याचा शोध घेतला, परंतू कोणीही मिळून आले नाहीत.

अखेर शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी आपल्या पथकामार्फत बसस्थानकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना सुभाषने चोरी केल्याचे दिसले. शनिवारी सकाळीच तो चहा पिण्यासाठी अंबीका चौकात येताच त्याला बेड्या ठाेकल्या. तसेच त्याची अंगझडती घेतली असता खिशातून लाख रूपये हस्तगत करण्यात आले. चोरट्याला आता शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम आदींनी केली.

बसस्थानकातील पोलिस करतात काय?

चोरीसह इतर गुन्हे टाळण्यासाठी बीड बसस्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची नियूक्ती केलेली आहे. परंतू ते चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यातही शिवाजीनगर पोलिसांना फारसे यश आलेले नाही. येथील कर्मचाऱ्यांबद्दलच आता संशय व्यक्त केला जात असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Thief who looted lakhs of rupees from a passenger from Beed bus station jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड