कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 08:25 PM2020-11-28T20:25:53+5:302020-11-28T20:26:14+5:30
House Breaking : अमन पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी
जळगाव : पत्नीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मागे चोरट्यांनी घरफोडी करुन कर्जाने काढलेले एक लाख रुपये व दीड लाखाचे दागिने असा अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी १ या दरम्यान उस्मानिया पार्कमधील अमन पार्कमध्ये घडली. याप्रकरणी घरमालक फकिरा खान उस्मान खान (वय ४०) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फकिरा खान हे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी शमीनाबी ही गर्भवती असल्याने शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घराला कुलुप लावून ते पत्नीला दवाखान्यात घेऊन गेले. तेथून परत १ वाजता घरी आले असता कुलुप कापलेले व खाली पडलेले होते. घरातील बेडरुमधील कपाट उघडे होते तर त्यात फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज म्हणून काढलेले एक लाख रुपयांची रोकड गायब झाली होती. त्याशिवाय पत्नीचे दागिनेही गायब झालेले होते. भरदिवसा व तीही वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाल्याने खान दाम्पत्याला धक्का बसला.
दरम्यान, याप्रकारानंतर खान यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घरफोडीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घराची पाहणी केली तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाकडून परिसरात टेहाळणी करण्यात आली. पोलिसांनी काही संशयितांची चौकशी केली तर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तपासणी केली.
असा गेला मुद्देमाल
१ लाख रुपये रोख
३१ हजार २८७ रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंग
२२ हजार ५६५ रुपये किमतीचे सोन्याचे मनी व पोत
६० हजार रुपये किमतीची सोन्याची पांचाली पोत
९ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी
१५ हजार ५७० रुपये किमतीचे चांदीचे पैंजन
१ हजार २६० रुपये किमतीची सोन्याची नाकातील फुली
४ हजार ७२८ रुपये किमतीचे सोन्याचे स्टाप